नेपाळ पूरस्थिती : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारची हेल्पलाईन जारी ! - टॉप न्यूज मराठी

नेपाळ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंत्रालय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना मदत पोहोचवण्यासाठी एक विशेष लिंक जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन अडकलेल्या व्यक्तीची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, नेपाळमधील सध्याचे ठिकाण, हॉटेलचा पत्ता, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.

तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. राज्य नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1070 आहे. तसेच 9321587143 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. अधिकृत ई-मेल controlroom@maharashtra.gov.in वर देखील माहिती पाठवता येईल. नागरिकांनी घाबरून न जाता या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.