भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक कारची (EV) जागतिक बाजारपेठेतील मागणी आता रॉकेटच्या वेगाने वाढत असून चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच तिमाहीत भारतीय EV निर्यातीत तब्बल १६ पट वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या पहिल्या तिमाहीत भारताच्या इलेक्ट्रिक कार निर्यातीतून मिळणारे एकूण उत्पन्न मागील वर्षातील २.२२ कोटी डॉलर्सवरून थेट ३६.९ कोटी डॉलर्सवर पोहोचले आहे. या कालावधीत निर्यात झालेल्या वाहनांची संख्याही १,३०९ वरून वाढून थेट १०,८०२ वर पोहचली आहे. या विक्रमी घोडदौडीमध्ये 'मेड इन इंडिया' गाड्यांसाठी संपूर्ण युरोप हा सर्वात मोठा खरेदीदार देश ठरला असून, ब्रिटनने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही आकडेवारी जागतिक स्तरावर भारतीय इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची मजबूत स्पर्धात्मकता आणि वाढती स्वीकारार्हता स्पष्टपणे दर्शवते.या जागतिक विस्तारामध्ये स्पेन हा भारतीय इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वाधिक ४० टक्के वाट्यासह अव्वल क्रमांकाची बाजारपेठ ठरला असून, भारताने स्पेनला सुमारे १४.६४ कोटी डॉलर्स मूल्याच्या ४,००७ इलेक्ट्रिक कार पाठवल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनने ७.८७ कोटी डॉलरच्या गाड्या आयात केल्या असून, तिथली निर्यात एका गाडीवरून थेट २,६४६ वाहनांवर गेली आहे. युरोपमधील जर्मनी (२.५१ कोटी डॉलर्स), नॉर्वे (२.११ कोटी डॉलर्स) आणि डेन्मार्क या प्रगत देशांशिवाय भारताने आशिया-पॅसिफिक क्षेत्रात जपान (१.३४ कोटी डॉलर्स), इस्रायल आणि ऑस्ट्रेलियामध्येही आपली पकड मजबूत केली आहे. नेपाळसारख्या पारंपरिक बाजारपेठेसह आता लॅटिन अमेरिकेतील ब्राझील आणि कोलंबियासारख्या देशांमध्येही 'मेड इन इंडिया' इव्ही कार वेगाने धावू लागल्या असून भारत आता जागतिक स्तरावर उत्पादनाचा एक मुख्य केंद्र म्हणून उदयास येत आहे.