अध्यात्म : घरासमोर बेलाचे झाड असावे की नसावे ? समज-गैरसमज आणि शास्त्रीय कारण ? महादेवाला बेल इतका प्रिय का ? जाणून घ्या सविस्तर माहिती - टॉप न्यूज मराठी

हिंदू धर्मात बेलाच्या झाडाला अत्यंत पवित्र स्थान आहे. याला श्रीफळ किंवा शिवद्रुम असेही म्हणतात. बेलाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर वास करतात अशी मान्यता आहे.

महादेवाला बेलपत्र इतके प्रिय का ?

पौराणिक कथेनुसार, जेव्हा समुद्र मंथनातून हलाहल विष निघाले, तेव्हा महादेवांनी ते प्राशन केले. त्या विषाची उष्णता शांत करण्यासाठी देवांनी त्यांना बेलपत्र खायला दिले. बेलपत्र हे शीतल असते, त्यामुळे महादेवांच्या मस्तकावरील उष्णता शांत झाली. तेव्हापासून महादेवाला बेलपत्र अर्पण करणे हे सर्वात पुण्यकारक मानले जाते. बेलपत्राचे तीन पान हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे आणि सत्व, रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानले जाते.

3 पानांचा बेल आणि 5 पानांचा बेल यात काय फरक ?

सामान्यतः बेलाला 3 पाने असतात, यालाच त्रिदल बेल म्हणतात आणि हाच पूजेसाठी वापरला जातो. मात्र क्वचित कधी 5 पानांचा बेल सापडतो. शास्त्रानुसार 5 पानांचा बेल हा अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी मानला जातो. याला पंचमुखी बेल म्हणतात. असे मानले जाते की 5 पानांचा बेल हा 1 लाख बेलपत्रांइतका पुण्यदायी असतो आणि याची पूजा केल्याने पंचमुखी शिवाचे फळ मिळते. ज्यांना 5 पानांचा बेल सापडतो ते अत्यंत भाग्यवान मानले जातात.

घरासमोर बेलाचे झाड असावे की नाही ? - समज गैरसमज

अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहे की घरासमोर बेलाचे झाड लावू नये. पण वास्तुशास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्या घरासमोर बेलाचे झाड असते तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. मात्र हे झाड घराच्या अगदी मुख्य दरवाजासमोर आणि दक्षिण दिशेला लावू नये, कारण त्याची मुळे खूप पसरतात.

बेलाच्या फळाचे आरोग्याला फायदे

बेलाचे फळ हे आयुर्वेदात अमृत मानले गेले आहे. पोटाच्या सर्व विकारांवर हे रामबाण उपाय आहे. बेलाच्या सरबताने उष्माघातापासून बचाव होतो, पचनक्रिया सुधारते आणि मधुमेह नियंत्रित राहतो. यामध्ये व्हिटॅमिन C आणि फायबर भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.