पुणे : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी शेततळे घेतले आहे, अशा शेततळ्यामध्ये पडून होणारे अपघात रोखण्यासाठी कृषी विभागाने काही महत्त्वाच्या उपाययोजना जारी केल्या आहेत. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
1. कुंपण करणे बंधनकारक : शेततळ्याभोवती मजबूत तारेचे कुंपण करावे, जेणेकरून लहान मुले, जनावरे किंवा इतर व्यक्ती चुकून तळ्यात पडणार नाहीत. जर तारेचे कुंपण करणे शक्य नसेल तर काटेरी झाडांचे जैविक कुंपण करावे.
2. दोरखंड आणि जाळी लावा : शेततळ्याच्या काठावर मजबूत दोरखंड लावावेत. प्लास्टिक अस्तर असलेल्या तळ्याच्या उतारावर दोरखंडाची जाळी लावावी, जेणेकरून पडलेल्या व्यक्तीला बाहेर येता येईल.
3. चेतावणी फलक लावा : शेततळ्याच्या समोर दिसेल अशा ठिकाणी "धोका - शेततळ्यात बुडून जीवितहानी होऊ शकते" असा मोठ्या अक्षरातील फलक लावावा. त्यावर 108 रुग्णवाहिका आणि पोलीस स्टेशनचा नंबर ठळक अक्षरात लिहावा.
4. बचाव साहित्य ठेवा : शेततळ्याजवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्यूब, दोरखंड किंवा प्लास्टिकचे रिकामे कॅन यांसारखे तरंगणारे साहित्य ठेवावे.
या सर्व उपाययोजना करून शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्याच्या ठिकाणी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.