मनोरंजन : अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या असताना सुनीता यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र नंतर त्यांनीच ही याचिका मागे घेतल्याची माहिती गोविंदाच्या मॅनेजरने दिली. याचिका मागे घेतली असली तरी दोघांमधील मतभेद अजूनही मिटले नसल्याचे बोलले जात आहे.
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच गोविंदा आणि सुनीता यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली, तरी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करणे हा त्यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही हेच दर्शवत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. या अनफॉलोच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले असून दोघांकडूनही यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, सुनीता यांनी यापूर्वी गोविंदा आपल्यासोबत राहत नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित अफेअरचा आरोपही केला होता. सुनीता यांच्या मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातील उपस्थितीमुळेही या चर्चांना अधिक बळ मिळाले. तर दुसरीकडे गोविंदा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या आणि बदनामीकारक बातम्यांविरोधात आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
इन्स्टाग्राम अनफॉलोच्या या प्रकरणानंतर सोशल मीडियावर फॅन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही फॅन्सनी '90 च्या दशकातील ही सुपरहिट जोडी अशी तुटू नये' अशी भावना व्यक्त केली आहे, तर काहींनी 'प्रसिद्धीसाठी हा स्टंट आहे का?' असा सवाल उपस्थित केला आहे. काही नेटकऱ्यांनी सुनीता यांना पाठिंबा देत गोविंदावर टीका केली आहे, तर गोविंदाच्या चाहत्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.