अमराठी रिक्षाचालक अस्वस्थ ! "राज्यात येऊन धंदा करा, परंतु मराठी अस्मितेचा आदर करा..!" परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच खडसावलं - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईत मराठी-अमराठी रिक्षाचालक वाद पेटला असून अमराठी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय निरुपम यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत अमराठी चालकांना खडसावले. "राज्यात येऊन धंदा करा, तुमचे स्वागत आहे, पण मराठी अस्मितेचा आदर करावाच लागेल. मुजोरी केली तर मुजोरी मोडून काढू," असा थेट इशारा सरनाईक यांनी दिला.

मुंबईत नेमकं काय घडलं ?

सरकारने अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी शिकणे बंधनकारक केले आहे. संधी देऊनही मराठी न शिकणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याने अमराठी चालक अस्वस्थ झाले आहेत. या निर्णयाविरोधात काही अमराठी रिक्षाचालकांनी कांदिवलीत रास्ता रोको आंदोलन केले. तर एका अमराठी रिक्षाचालकाने थेट एका मराठी रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामुळेच मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे.

पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक काय म्हणाले ? 

प्रताप सरनाईक म्हणाले, "महायुतीचं सरकार रोजगार निर्मिती करणारं सरकार आहे. राज्यात येऊन धंदा करा, पण मराठी अस्मितेचा आदर करा. कोणावरही बेकायदेशीर कारवाई होणार नाही, हे मी आधीच सांगतो. माझं आवाहन आहे की, बेकायदेशीररित्या कोणत्याही रिक्षाचालकावर कारवाई करता कामा नये. संजय निरुपम यांचे आभार मानतो, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे, त्यांना मराठी अस्मितेची जाण आहे. शशांक राव यांचाही कॉल आला होता, त्यांनीही प्रतिसाद दिला."

ते पुढे म्हणाले, "काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. तुम्ही नेते मंडळी आहात, संभ्रम दूर करणे तुमचे काम आहे. वेगवेगळे विषय आहेत. बऱ्याच रिक्षाचालकांविरोधात तक्रारी आहेत - कोणी जवळचे भाडे घेत नाही, कोणी जाणीवपूर्वक लांबून फिरवतो, कोणी अरेरावीची भाषा करतो, कुठेही गाडी पार्क करतो. पण आजचा विषय फक्त मराठी अस्मितेचा आहे. जो मुजोरी करेल आणि मराठी बोलणार नाही, त्याची मुजोरी मोडून काढू."

अमराठी रिक्षाचालकांसाठी नेमके नियम काय ?

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. या काळात त्यांना मोफत मराठी शिकण्याची संधी आणि प्रशिक्षण दिले जाईल. एका महिन्यातही मराठी शिकले नाहीत, तर त्यांचा परवाना आणि बॅच तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. त्यानंतरही शिकले नाहीत, तर कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई कायद्याच्या कक्षेत राहून केली जाईल.