शंभरावे मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील - टॉप न्यूज मराठी

पुणे : शंभरावे साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलने ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर व महत्त्व वाढविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तर  शंभरावे साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारे ठरावे. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्व मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखासोबत उद्योगमंत्री यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर बैठक स्थळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आदी उपस्थित होते.

शंभरावे मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी

शंभरावे मराठी साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलने ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्यांशी जोडण्याबरोबरच मराठी भाषेचा वापर आणि महत्त्व अधिक व्यापक करण्यासाठी सर्व विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले. साहित्य संमेलनाच्या आयोजनात सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, राज्यातील स्वायत्त महाविद्यालये आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली गेली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग सुरू करावा. मराठी भाषेचे महत्त्व आणि महती सर्वांना माहिती आहे. मात्र, त्याचा प्रत्यक्ष वापर आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयीची आवड वाढविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वायत्त विद्यापीठांना अभ्यासक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य असल्याने त्यांनी मराठी भाषेचे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा, प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा विभाग सुरू करून विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही श्री. पाटील म्हणाले.

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दिवसभराचे किंवा आठ तासांचे साहित्य संमेलन विद्यापीठांनी आयोजित करावे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी लागणारे इनपुट संयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

शासकीय विद्यापीठांमध्ये आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा शिकविली जाते. त्याच धर्तीवर स्वायत्त महाविद्यालये आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्येही मराठी भाषा शिकविणे आवश्यक आहे. या विभागाची रचना, प्राध्यापकांची संख्या आणि इतर बाबी संबंधित विद्यापीठांनी त्यांच्या गरजेनुसार ठरवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या पुढाकाराचे पाटील यांनी कौतुक केले.

शंभरावे साहित्य संमेलन सर्व मिळून ऐतिहासिक करूया-उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत

शंभरावे साहित्य संमेलन केवळ शतकपूर्तीचा उत्सव न ठरता, पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारे ठरावे. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत नवी साहित्यिक चळवळ उभी करण्यासाठी राज्यातील विद्यापीठे, साहित्यिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन हे संमेलन ऐतिहासिक करूया, असे आवाहन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

श्री. सामंत म्हणाले, १०० व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेले विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला सातत्याने व्यासपीठ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून नव्या साहित्यिकांची निर्मिती होईल, असा विश्वास मंत्री श्री सामंत यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात अकरावी- बारावीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २०४७ च्या विकसित भारताबद्दल तुम्हाला काय वाटते?’ या विषयावर मराठीतून निबंध लेखन स्पर्धा घेण्याची संकल्पनाही मांडण्यात आली. राज्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले, तर एका विषयावर कोट्यवधी विद्यार्थ्यांनी विचार मांडण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित होण्यास मदत होईल, या लेखनातून विद्यार्थ्यांचे आधुनिक जगासमोरील आव्हानांबाबतचे विचार तसेच मातृभाषेबद्दलची भावना समजून घेता येईल, असेही मंत्री सामंत यांनी  स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, साहित्य संमेलने केवळ काही शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील साहित्यिकांनाही त्यात सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिकांना साहित्य संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून विशेष व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १०० साहित्यिक सहभागी झाले, तर सुमारे ३ हजार ६०० साहित्यिकांना संमेलनात सहभागी होता येईल.साहित्यिकांचा सत्कार शाल देवून करण्याऐवजी पुस्तकांनी करण्याची परंपरा निर्माण करावी.

विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी निश्चित नियमावली, कार्यक्रमाचा आराखडा व कार्यपद्धती विद्यापीठांना पाठविण्यात येणार आहे. १०० वे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरावे आणि त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक साहित्य संमेलनाने त्यापेक्षा व्यापक उपक्रम राबवावेत, या दृष्टिकोनातून सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. गडचिरोलीपासून सिंधुदुर्गापर्यंतच्या विद्यापीठांमधून निर्माण होणारे साहित्य राज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरजही आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि प्रगतिशील भागातून निर्माण होणाऱ्या साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी थेट निधीतून मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : किरण कुलकर्णी

एखाद्या भाषेच्या साहित्य संमेलनाचे शंभरावे पर्व साजरे होणे, ही जगातील एक दुर्मीळ आणि ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घडणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. या ऐतिहासिक संमेलनासाठी शासन, साहित्य संस्था, विद्यापीठे आणि समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, विविध साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, उच्च शिक्षण विभाग तसेच या क्षेत्रातील संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संमेलन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापली भूमिका प्रभावीपणे पार पाडावी, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. 

विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून साहित्यिक चळवळ व्यापक करूया: प्रा. डॉ. सुरेश गोसावी

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात होत असल्याचा मनस्वी आनंद आणि अभिमान आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन सर्वतोपरी सक्रिय राहील. संमेलनाच्या तयारीसाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये विद्यापीठाकडून सहकार्य केले जाईल. विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक तसेच विविध घटकांना या संमेलनाशी जोडून घेण्यात येईल. सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्याने हे संमेलन भव्य, दर्जेदार आणि ऐतिहासिकदृष्ट्या संस्मरणीय करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असा विश्वास प्रा. डॉ. गोसावी यांनी व्यक्त केला.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत तसेच आढावा बैठकीमागील भूमिका स्पष्ट केली. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मराठी भाषा विभाग, संबंधित सर्व यंत्रणा, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रांतील घटकांच्या सक्रिय सहभागातून हे साहित्य संमेलन भव्य आणि ऐतिहासिक करूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साहित्याचा पुढचा काळ हा सुवर्णकाळ असेल : योगेश सोमण

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत तसेच या संमेलनातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांचे प्रतिनिधी आज एकत्र आले, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठे आणि साहित्य क्षेत्र यांच्यातील हा समन्वय संमेलनाला व्यापक स्वरूप देणारा ठरेल, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने शंभर वर्षांचा टप्पा पार करून पुढे वाटचाल करणे ही मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने अभिमानाची आणि उल्लेखनीय बाब आहे. या ऐतिहासिक टप्प्याचा उत्सव साजरा करताना भविष्यातील साहित्यिक चळवळीला अधिक व्यापक दिशा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. साहित्य, शिक्षण आणि विद्यापीठे यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्यास मराठी साहित्याचा पुढील काळ हा निश्चितच सुवर्णकाळ असेल, असा विश्वास योगेश सोमण यांनी व्यक्त केला.

बैठकीत राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, त्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, संमेलन अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नवकल्पना मांडल्या.