पुणे : आज काँग्रेस नेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आज 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाआधीच पुण्यात आरोप प्रत्यारोपांचे चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमावर थेट जोरदार हल्लाबोल केला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मोठे आरोप केले असून ते म्हणाले कि , "हा छात्रों की गुंज नसून पैसों की गुंज कार्यक्रम आहे. राहुल गांधींकडे उत्स्फूर्त गर्दी येत नाही म्हणून काँग्रेस पैसे देऊन गर्दी जमवत आहे. हे काँग्रेसचे नवे PPP मॉडेल आहे - Paid Political Program," असा आरोप बन यांनी केला. शुक्रवारी रात्री या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात NSUI आणि ABVP मध्ये राडा झाल्यानंतर भाजपने हा आरोप करत काही व्हिडीओही दाखवले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=fQcA9K_a7jk
या पत्रकार परिषदेमध्ये नवनाथ बन यांनी आरोप केला की, " या कार्यक्रमासाठी सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये देऊन आणले जात आहे. "जर 3 हजार लोकांना प्रत्येकी 35 हजार दिले, तर 9 ते 10 कोटी रुपयांचा खर्च होतो. राहुल गांधींना पुन्हा रिलाँच करण्यासाठी केवळ गर्दी जमवण्यावर 10 कोटींचा खेळ सुरू आहे. यामागे कोण आहे, याची सरकारने चौकशी करावी," अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसच्या मते, या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवणे आहे. देशातील शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसारख्या प्रश्नांवर थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर मांडणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांसोबत कोणत्या विषयांवर संवाद ?
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात राहुल गांधी हे प्रामुख्याने 4 मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत.
1. शिक्षणातील वाढते खाजगीकरण आणि फी वाढ
2. नोकरी-भरतीतील पेपरफुटी आणि बेरोजगारी
3. कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
4. उच्च शिक्षण आणि संशोधनासाठीच्या संधी