खवड्या डोंगरावर भयंकर प्रसंग ! मानसिक नैराश्यातून मुलाची डोळ्यादेखत आत्महत्या, वाचवताना वडीलही कोसळले दरीत, आईने देखील संपवले आयुष्य, तिसगावात नेमकं काय घडलं ? - टॉप न्यूज मराठी

तीसगाव : तिसगावतून आज हृदय पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव भागातील खवड्या डोंगरावर आज शुक्रवारी एका कुटुंबावर काळाने झडप घातली. एका 18 वर्षीय मुलासह त्याच्या आई-वडिलांचा डोंगरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांची नावे कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी असून ते देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी आहेत.

नेमकं काय घडलं?

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कुणाल हा खवड्या डोंगराच्या कड्यावर गेला. टोकावर उभा राहून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून आई-वडील आणि गावकरी धावत आले. तब्बल 3 तास सर्वांनी त्याची समजूत काढली - 'बाळा, उडी मारू नकोस, शिक्षित आहेस, आई-वडिलांचा विचार कर'. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले, त्याच क्षणी कुणालने उडी मारली आणि त्याला पकडताना वडिलांचाही तोल गेला. दोघेही दरीत कोसळून जागीच ठार झाले. हे पाहून आईनेही धावत जाऊन डोंगरावरून उडी घेतली आणि तिनेही जीव सोडला. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली. 

प्रत्यक्षदर्शी माजी सरपंच काय म्हणाले?

या थराराचे साक्षीदार असलेले तीसगावचे माजी सरपंच संजय जाधव म्हणाले, "मी 5 फूट अंतरावर होतो. पोलीसही माझ्यासोबत होते. तो सतत जागा बदलत होता, फक्त आईशी बोलत होता. आम्ही 3 तास विनंती केली. आईने 'बाळा असं करू नकोस' म्हणून खूप विनवलं. पण तो डिप्रेशनमध्ये गेलेला वाटत होता. तो फक्त 'मला मरायचंच आहे' असे म्हणत होता. वडील वर आले आणि त्याला धरायला गेले तेव्हाच दोघे खाली पडले."

या कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. घरगुती वाद की अन्य काही, पोलीस तपास करत आहेत. पण एक स्पष्ट आहे, तो तरुण नैराश्यात होता, तो संवादाच्या पलीकडे गेला होता. एका मुलाच्या मानसिक घुसमटीने अख्खं कुटुंब संपलं. जेव्हा एखादी व्यक्ती "मला मरायचंय" असे बोलते, तेव्हा ती कमजोर नसते, तर तिला आधाराची नितांत गरज असते. अशावेळी वाद न घालता त्याला ऐकणे, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे हाच खरा उपाय आहे.