मनोरंजन जगत : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा चांगलाच सामना करावा लागत आहे. गुरुवारी तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत, काही युजर्सकडून तिला अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यातील काही युजर्स स्वतःला मराठी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक म्हणवत असल्याचे तिने म्हटले आहे.
श्वेताने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तिला अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या देण्यात आल्या आहेत. तिने लिहिले की, ही शिवीगाळ फक्त तिच्यापुरती मर्यादित नाही, तर तिच्या 8 वर्षाच्या मुलावर आणि मुलीवरही घाणेरड्या कमेंट्स केल्या गेल्या आहेत. काल परूल गुलाटीच्या लाईव्हमध्येही तिला आणि परूलला हीच शिवी दिली गेल्याचे तिने नमूद केले. धक्कादायक म्हणजे शिवीगाळ करणारे लोक अडाणी नाहीत, तर सुशिक्षित, चांगल्या घरातले आहेत, ज्यांच्या घरी आई, बहीण, पत्नी आहेत. तरीही दुसऱ्या महिलेला शिवी देताना त्यांना लाज वाटत नाही, अशी खंत तिने व्यक्त केली.
याच मुद्द्यावर श्वेताने राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे. ती म्हणाली, "मी माझे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवले, माझे वडील मुंबईत वाढले. मराठी माणूस महिलांचा आदर करतो असा माझा विश्वास होता. पण अभिमानाने स्वतःला मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या DM मध्ये जाऊन शिवीगाळ करत असतील तर मराठी माणूस असण्याचा अर्थ हाच आहे का ?" राज ठाकरे, जर हे तुमचे समर्थक असतील तर तुम्हाला त्यांचे हे वागणे मान्य आहे का? असा सवाल तिने केला आहे.
या प्रकरणावर मनसे किंवा राज ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. श्वेताच्या पोस्टनंतर हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून ट्रोलर्सवर कारवाईची मागणी होत आहे.