नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय 80 वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर विविध आजारांवर उपचार सुरू होते. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
सज्जन कुमार हे 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील एक प्रमुख आरोपी होते. त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खटले सुरू होते. त्यापैकी एका प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होते. दुसरे प्रकरण जनकपुरी परिसरातील हिंसाचाराशी संबंधित होते. या प्रकरणात दिल्ली कोर्टाने जानेवारी 2026 मध्ये पुराव्याअभावी त्यांना दोषमुक्त केले होते. राजकारणात ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी खासदार म्हणूनही काम पाहिले होते.
सज्जन कुमार यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबीयांनी तातडीने दिल्ली गाठली. त्यांच्या पश्चात मुलगा जग प्रवेश कुमार आणि इतर कुटुंबीय आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतचा निर्णय कुटुंबीयांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाकडून पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत.