मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात आवडती जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील आदित्य आणि मेघनाच्या भूमिकेने ही जोडी घराघरात पोहोचली होती. त्यानंतर दोघेही स्वतंत्रपणे चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
ललितने 'लय भारी', 'नटसम्राट', 'ऑनलाइन बिनलाइन', 'अनंदी गोपाळ' सारख्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या. तर प्राजक्ताने 'बॉईज', 'फ्रेंड्स', 'बकेट लिस्ट' आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं.
आता दोघेही एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ आहे. नावावरूनच हा चित्रपट प्रेम, नातं आणि लग्नावर आधारित असल्याचं दिसतंय. या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर एका खास व्हिडीओद्वारे करण्यात आली.
व्हिडीओमध्ये दोघांची भेट 'जुळून येती रेशीमगाठी' मधल्या पहिल्या भेटीसारखीच दाखवण्यात आली आहे. प्राजक्ताने पोस्टला "आणि आम्ही परत एकत्र आलो.. गेली 13 वर्षे हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला ही जोडी परत येतेय" असं कॅप्शन दिलं आहे. 'The OG Jodi is back' अशी टॅगलाइनही तिने दिली आहे.
या चित्रपटात साधं लग्न नसून डेस्टिनेशन वेडिंग दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेमकहाणी, लग्नसोहळा आणि धमाल यांचा संगम पाहायला मिळेल. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 1 मे 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.