नागपूर : राजकारण आणि सत्तेच्या पलीकडे माणुसकी जपणारा एक भावनिक क्षण आज नागपुरात पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या प्रीती आकडे हिचा आज पुनर्विवाह पार पडला. या विशेष विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः उपस्थिती लावून वर-वधूवर अक्षता टाकून आशीर्वाद दिले. नागपुरात पार पडलेला हा सोहळा राजकीय नव्हे तर एका भावाच्या भूमिकेतून पार पडला.
प्रीती कोण आहे ?
प्रीती आकडे ही एक सामान्य कुटुंबातील तरुणी. तिच्या पहिल्या पतीचे कोरोना काळात आजारपणामुळे दुर्दैवी निधन झाले होते. अगदी कमी वयात वैधव्याचे दुःख तिच्या वाट्याला आले. तिच्यासारख्या 19 ते 25 वयोगटातील अनेक तरुणींवर कोरोना काळात ही वेळ आली होती. पती गेल्यानंतर प्रीतीचे आयुष्य अंधारात गेले होते. आज तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवी पहाट आली आहे.
आज या सोहळ्यात भावुक झालेल्या प्रीतीने सांगितले, "आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. माझे दोन भाऊ माझ्या पाठीशी आहेत, याचा प्रचंड आनंद होतोय" असे म्हणत तिने देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांचे आभार मानले.
फडणवीसांनी दत्तक का घेतले ?
कोरोना काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांचे मित्र आणि भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांच्यासोबत त्यांनी सुमारे 300 कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. ही सर्व कुटुंबे अशी होती ज्यांनी कोरोना काळात आपला कर्ता पुरुष गमावला होता.
फडणवीसांनी स्वतः 100 कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले होते. गेल्या चार वर्षांपासून या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जात होती. माजी आमदार संदीप जोशी म्हणाले, "कोविड काळात दुर्दैवाने 293 बहिणींच्या वाट्याला दुःख आले. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी साथ दिली. आज प्रीतीच्या विवाहाने या कार्याची खरी सुरुवात झाली आहे".