भारतीय उद्योग जगतातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. टाटा समूहाची मुख्य कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १८ ऑगस्ट रोजी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार असून, त्याआधीच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. एन. चंद्रशेखरन हे तडकाफडकी पद सोडणार नसून ते आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करतील. हा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपत आहे. चंद्रशेखरन हे २०१७ पासून टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. टाटा समूहात त्यांचा तब्बल ३९ वर्षांचा प्रवास आहे. १९८७ मध्ये ते टाटा समूहात सामील झाले होते आणि या सर्वोच्च पदावर पोहोचण्यापूर्वी त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून प्रदीर्घ काळ काम केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरन यांच्या पुढील कार्यकाळाबाबत 'टाटा सन्स' आणि 'टाटा ट्रस्ट्स' यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले होते. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला थेट विरोध केला होता. टाटा सन्स ही कंपनी कधीही शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ नये, अशी नोएल टाटांची स्पष्ट इच्छा होती. मात्र, चंद्रशेखरन यांनी या अटीला तीव्र विरोध दर्शवला होता. बोर्डातील प्रतिनिधींच्या अधिकारांवरून आणि निर्णय प्रक्रियेवरून दोन्ही पक्षांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद असल्याचे म्हटले जाते. या अंतर्गत वादांमुळेच अखेर चंद्रशेखरन यांनी पुढील कार्यकाळ न स्वीकारता फेब्रुवारी २०२७ मध्ये सन्मानाने पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता टाटा सन्सचा पुढील अध्यक्ष कोण असणार, याकडे संपूर्ण कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे.