भारतातील मोठ्या शहरांमधील भीषण वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. येत्या २०२८ पर्यंत देशातील प्रमुख शहरांच्या आकाशात इलेक्ट्रिक एअर टॅक्सी (eVTOL) प्रत्यक्ष सेवेत आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या आधुनिक हवाई वाहतूक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष चाचण्यांना पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली जाणार आहे. बंगळुरू, मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मेट्रो शहरांमधील प्रवाशांसाठी हा एक अत्यंत जलद आणि नवा पर्याय ठरणार आहे. तासंतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांचा वेळ यामुळे मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.
मोबाईल ॲपवरून टॅक्सी बुक केल्यानंतर प्रवाशांना थेट इमारतीच्या छतावर तयार करण्यात आलेल्या विशेष 'व्हर्टिपॅड'वर जावे लागेल. तिथून ही टॅक्सी थेट हवेत उड्डाण करेल. सध्या रस्त्याने नोएडा ते गुरुग्राम प्रवास करण्यासाठी १ ते २ तास लागतात. मात्र, एअर टॅक्सीमुळे हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत पार करता येणे शक्य होणार आहे.
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायही विमाने पूर्णपणे इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी असल्याने यामुळे प्रदूषण होणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी असेल. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख व्यापारी केंद्रांना जोडण्यावर सरकार भर देत आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि नियमावली तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या योजनेमुळे भारतातील वाहतूक क्षेत्रात एक मोठी क्रांती होणार असून, भविष्यातील प्रवासाची व्याख्या पूर्णपणे बदलणार आहे.