सुकन्या समृद्धी योजना : सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन, जाणून घ्या सविस्तर माहिती - टॉप न्यूज मराठी

पुणे :  मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने (SSY) मध्ये पालकांनी आपल्या पात्र मुलींची खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आहे.

पुणे विभागात या योजनेअंतर्गत सुमारे ८ लाख मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजारापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याजदर असून, योजनेची परिपक्वता २१ वर्षांनी होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून योजनेचा अधिकाधिक प्रसार करून पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन- ८४४८३२९८४४, नितीन येवला- ८८३०७०५५४१, दिलीप सर्जेराव- ९७६६०७७९९६, केतन शित्रे, बारामती -९२७०५३२३९४, अविनाश पाखरे- ८७८८३२३२१८ यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गिरासे यांनी केले आहे.