कोपर्डी, नसरापूर आणि आता पिंपळवंडी ! पुन्हा एक चिमुरडी गेली... न्याय मिळेल, पण जीव परत येणार नाही ! पालकांनो सतर्क व्हा... - टॉप न्यूज मराठी

पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी दुपारी एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. आजारी असल्याने शाळेत न गेलेली 9.5 वर्षांची चिमुकली घरात टीव्ही बघत बसली होती. शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने तिला घराबाहेर नेले आणि तिच्यावर अत्याचार करून हत्या केली. काल दुपारी 3:30 ते 4 च्या दरम्यान घडलेल्या या घटनेने गावात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं ? 

मंगळवार होता. त्या दिवशी पोटदुखीमुळे मुलगी शाळेत गेली नव्हती. घरी आजी-आजोबांसोबत ती टीव्ही पाहत बसली होती. दुपारच्या सुमारास शेजारी राहणारा तो तरुण तिच्या घरासमोर आला. "चल बाहेर खेळायला जाऊ, सगळी मुलं वाट बघतायत" असे सांगून त्याने तिला बाहेर बोलावले. आजारी असल्याचे सांगून ती नकार देत होती, पण "5 मिनिटात येऊ" असे म्हणून तो तिला सोबत घेऊन गेला.

निघताना तिने फक्त एवढेच सांगितले "आजी, मी लवकर येते". 

1 तास, 2 तास... मुलगी परत आली नाही. कुटुंबीयांनी शोध सुरू केला. गावातील लोकही मदतीला आले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तोच तरुण देखील गावकऱ्यांसोबत "कुठे गेली असेल?" असे नाटक करत मुलीला शोधत होता. 

संध्याकाळी 6 च्या सुमारास गावाबाहेरील उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला तिथे नेले आणि हा कृत्य केले. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर तपासात हे समोर आले.

पोलिसांची आतापर्यंतची कारवाई

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. 

1.  आरोपी ताब्यात: घटनेनंतर काही तासातच शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

2.  तपास सुरू: पुणे ग्रामीणचे SP संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आहे. जागेचा पंचनामा, वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. 

3.  गावात तणाव: घटनेमुळे पिंपळवंडी आणि परिसरात संताप आहे. ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा आणि जलद खटल्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राच्या जखमा: कोपर्डी आणि नसरापूर

दुर्दैवाने राज्याला अशा घटना नवीन नाहीत. 

2016 - कोपर्डी प्रकरण : अहमदनगरमधील कोपर्डी गावात 14 वर्षीय शालेय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर "मूक मोर्चे" निघाले आणि संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर आला होता. 

नसरापूर प्रकरण : काही दिवसांपूर्वी  पुण्याजवळील नसरापूरमध्येही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणांनी समाजाला हादरवले आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला.

पिंपळवंडीची ही घटना त्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या करते आहे.

पालकांसाठी महत्वाचे

चाइल्ड हेल्पलाइन: मुलांशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास तातडीने 1098 या क्रमांकावर कॉल करा.

ओळखीचे असतील तरीही लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नका. शेजारी, नातेवाईक कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. मुलांशी रोज बोला, त्यांच्या भीती आणि अडचणी समजून घ्या. 

मुलांची सुरक्षा ही सर्वात पहिली जबाबदारी आहे. 5 मिनिटासाठी देखील दुर्लक्ष महागात पडू शकते.