"देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत पाठवू नका, महाराष्ट्रातच सेवा करू द्या !" नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस - टॉप न्यूज मराठी

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. यावर अखेर मुख्यमंत्री पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपुरात झालेल्या "युथ आयकॉन मंथन फॉर युथ हॅकथॉन" या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांनी त्यांना दिल्लीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या ?

या चर्चेवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी इथेच राहून राज्याची सेवा करावी. त्यांना दिल्लीत का पाठवले जात आहे? ते एक जबाबदार आणि अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची गरज इथेच आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचा प्रचार केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. याआधी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

तरुणांना दिला मार्गदर्शनाचा संदेश

हॅकथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी अमृता फडणवीस यांनी सहभागी तरुणांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आज इथे येऊन मला खूप अभिमान वाटत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.

तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, उत्पादन आणि शिक्षण या सगळ्यामागे आपली बुद्धी काम करते. ती सशक्त ठेवणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताचे स्वप्न पाहत आहेत. पण ते स्वप्न साकार करण्यासाठी तरुण पिढीची भूमिका सर्वात मोठी आहे. त्या पुढे म्हणाल्या की, यश हेच सर्वस्व नसते. अपयशातूनही खूप काही शिकायला मिळते. मंथन अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शक मिळत आहेत. शाळा, कॉलेज, मेट्रो या सुविधा नागपूरने तुम्हाला दिल्या आहेत. आता तुमची वेळ आहे. तुम्ही तुमच्या कल्पना, तुमचे विचार समाजासमोर आणा. तुमच्या शहरासाठी आणि देशासाठी काहीतरी नवीन करा.

शिस्त, मेहनत आणि देशप्रेम याला योग्य दिशा मिळाली की मोठा बदल घडू शकतो. आज स्पर्धेत कोणी जिंकेल, कोणी नाही. पण त्यावरून कोणाची किंमत ठरत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. कलेची आणि विशेषतः गायनाची आवड असलेल्या अमृता फडणवीस या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे राजकीय आणि सामाजिक दोन्ही वर्तुळातून लक्ष दिले जात आहे.