धाराशिव : गेल्या काही आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पण यावेळी राजकीय पक्षांतरामुळे नाही, तर त्यांच्याच घरात झालेल्या राड्यामुळे. शिवसेना ठाकरे गटाला लागलेल्या खिंडारानंतर 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यात ओमराजे निंबाळकर यांचे नावही होते. सुरुवातीला त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम होता. एकनाथ शिंदे यांना देखील ओमराजे येतील की नाही याची धाकधूक होती. मात्र अखेर ओमराजेंनी शिंदे गटात प्रवेश करताच शिंदे गटाचं "ऑपरेशन टायगर" पूर्ण झालं अशी घोषणा करण्यात आली.
पण पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ओमराजेंच्या घरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील खासदारांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर दोन वरिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. पाहता पाहता वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. दोघेही एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारू लागले. याला "फ्री स्टाईल फाईट" असेही संबोधले जात आहे.
घरात अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. अखेर खासदारांचे बंधू डॉ. जयराजे निंबाळकर यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. त्यांच्यामुळेच हा वाद अधिक वाढण्यापासून टळला. मात्र दोघांमध्ये वाद नेमका कशावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदाधिकारी नेमणूक, कार्यकर्त्यांचे महत्त्व की निधी वाटप? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे राज्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा ते घेत आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात असतानाच खासदारांच्या घरीच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाला धक्का देऊन शिंदे गटात आलेल्या खासदारांच्या घरातच अशी घटना घडल्याने विरोधकांनाही टीका करण्याची संधी मिळाली आहे. पक्षवाढीच्या नादात आतंरिक वादही वाढत आहेत का? असा प्रश्न आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.