नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस गदारोळात गेला. 13 ऑगस्टला लोकसभेची कार्यवाही फक्त एका मिनिटासाठी सुरू होती. सभापती ओम बिरला यांनी सभागृहात 'वंदे मातरम' म्हणण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर लगेचच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते.
20 जुलैपासून सुरू झालेले हे अधिवेशन सुरुवातीपासूनच गोंधळाच्या सावटात होते. लोकसभेत एकूण 19 बैठका होणे अपेक्षित होते. दररोज सरासरी 6 तास कामकाज गृहीत धरल्यास सुमारे 114 तासांचा कालावधी मिळायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात केवळ 17 तास 30 मिनिटेच काम झाले. म्हणजेच जवळपास 96 तास 30 मिनिटे काम न होता गेले. 2025 च्या अधिवेशनातही अशीच स्थिती होती. तेव्हा 21 बैठकीत लोकसभेचे कामकाज फक्त 37 तास चालले होते.
आज संसदेच्या आवारातही सत्ता आणि विरोधक आमने-सामने आले. जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनातील पोलीस कारवाई आणि राम मंदिराच्या देणगीतील घोटाळ्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. तर झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरून एनडीएच्या खासदारांनी आंदोलन केले. दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये घोषणाबाजी आणि बाचाबाची झाली. सुरक्षारक्षकांना मध्ये पडावे लागले.
राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील त्यांच्या सभेनंतर झालेल्या तोडफोडीचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर एमएमडीआर दुरुस्ती विधेयक मंजूर करून सभागृह तहकूब करण्यात आले.
बाहेर आंदोलनानंतर काँग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. के.सी. वेणुगोपाल म्हणाले, "गृहमंत्री अमित शाह सभागृहात येऊन चर्चा का करत नाहीत? ते फक्त पत्र लिहित आहेत." प्रियंका गांधी म्हणाल्या, "संसदेत असे चित्र आम्ही कधीच पाहिले नाही." टीएमसीच्या महुआ मोईत्रा यांनीही सरकारवर निशाणा साधला. एकूणच चर्चा आणि विधेयकांपेक्षा गोंधळातच हे अधिवेशन संपले.