मुंबई : कायद्याचा राखणदारच कायदाभंग करताना पकडला गेला. मुंबई पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलवर ड्रग्ज खरेदी केल्याचा गंभीर आरोप लागल्याने खाकी वर्दीला डाग लागला आहे. मालवणी पोलिसांनी घातलेल्या सापळ्यात जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई किरण इंदुलकर हा एमडी ड्रग्ज विकत घेताना रंगेहाथ सापडला आहे. ही घटना उघडकीस येताच मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेट क्रमांक 8 परिसरात ड्रग्जची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मालवणी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱ्यालाच विक्रेता बनवून त्या ठिकाणी उभे करण्यात आले. ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती तेथे आली आणि त्याने 15 हजार रुपये देऊन 4 ग्रॅम एमडी म्हणजेच 'मेफेड्रोन' किंवा 'म्याव-म्याव' विकत घेतले. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत तो मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल किरण इंदुलकर असल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यातून एकूण 5 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. सध्या किरण इंदुलकर हा जोगेश्वरी पोलीस ठाण्यात नेमणुकीवर होता. मूळचा तो नायगाव येथील बीडीडी चाळीत राहतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण इंदुलकर यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच काळात तो या भागातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या संपर्कात आल्याचा संशय होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणांच्या नजरेत होता. याआधीही इंदुलकर विरोधात विभागीय तक्रारी आल्या होत्या. सुमारे 2 वर्षांपूर्वी त्याला ताकीद देऊन निलंबित करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.
अटक केल्यानंतर इंदुलकरला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. इंदुलकर एकटा होता की त्याच्यामागे कोणते मोठे रॅकेट आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्या दलाचे काम गुन्हेगारांना पकडणे आहे, त्याच दलातील एक कर्मचारी स्वतःच ड्रग्ज खरेदी करताना सापडल्याने मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, "कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. विभागांतर्गतही चौकशी सुरू आहे."
मुंबईसारख्या शहरात ड्रग्जचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलीस दल सतत कारवाई करत असताना, दलातीलच एका सदस्याचा असा सहभाग समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.