बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामतीत एमपीएससीची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या प्रियकर अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी काही तासांआधी मुलीने आईला केलेल्या फोनमुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
मृत तरुणी ऑक्टोबर 2025 पासून पुण्यात एमपीएससीचे क्लास करत होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिचे अथर्व, वय 27, याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे आईला कळले. दोन्ही कुटुंबांची एप्रिल 2026 मध्ये भेटही झाली होती आणि लग्नाचे ठरले होते. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता अथर्व कार घेऊन तिला बारामतीतील टी.सी. कॉलेजमध्ये एमबीए प्रवेशासाठी घेऊन गेला. संध्याकाळी 4 वाजता तिने आईला मेसेज करून माहिती दिली. त्यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता ती अथर्वसोबत कारमध्ये दिसली.
संध्याकाळी 7 वाजता आईने दोनदा फोन केला पण प्रतिसाद मिळाला नाही. मग अथर्वला फोन केला असता मुलीशी बोलणे झाले. त्या संभाषणात मुलीने धक्कादायक गोष्ट सांगितली. *"अथर्व मला त्याच्या घरी घेऊन जातोय. त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला गोळी खायला देणार आहे."* हे ऐकून आईने तिला लगेच घरी येण्यास सांगितले. रात्री 9 वाजता "जेवण करते" असा मेसेज आला आणि नंतर संपर्क तुटला. रात्री 10 वाजता अथर्वने आईला फोन करून सांगितले की मुलीला चक्कर आली आहे. त्याने तिला प्रथम देवकाते, नंतर भोंईटे आणि शेवटी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये नेले. आई 10.20 ला पोहोचली तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. अथर्वने सांगितले की तो तिला घरी घेऊन गेला होता आणि तिथे शारीरिक संबंधानंतर तिला चक्कर आली.
तक्रारीत आईने म्हटले आहे की मृत्यूच्या 15-20 दिवस आधीपासूनच मुलगी शांत होती. मैत्रिणीकडून कळले की अथर्व तिला शारीरिक संबंधासाठी आग्रह करत होता आणि काही गोळ्या देखील देत होता. त्यामुळे आईने अथर्ववर संशय व्यक्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूपूर्वीचा फोन, आधीपासून गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याची पद्धत या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिला कोणती गोळी देण्यात आली होती? याचा तपास वैद्यकीय, रासायनिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे केला जात आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.