मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायांमुळे नेहमीच चर्चेत असतात. भेसळयुक्त दूध, मिठाई आणि नियम न पाळणाऱ्या हॉटेल्सवर थेट कारवाई करणाऱ्या मुंढेंना लोक "खऱ्या आयुष्यातील सिंघम" म्हणतात.
अलीकडेच प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी त्यांची एक सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीत कठोर अधिकाऱ्याच्या भूमिकेबाहेर पडून मुंढे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मजेदार किस्सा शेअर केला. मुलाखतीदरम्यान "आपली आवडती अभिनेत्री कोण?" असा प्रश्न विचारताच त्यांनी 1998-99 सालातला प्रसंग सांगितला.
मुंढे म्हणाले, "तेव्हा मी मेन्सचा अभ्यास करत होतो. आम्ही सगळे मित्र पॅरासाइट म्हणून राहायचो आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचो. माझा एक मित्र, जो आता कस्टममध्ये आयुक्त आहे, तो एकदा रात्री 10-10.30 च्या सुमारास खोलीत आला आणि थेट माझ्या गळ्यात पडून रडायला लागला. मी घाबरलोच.मी त्याला विचारलं काय झालं ? पेपर वाचला का ? तेव्हा तो म्हणाला, अरे पेपर बघितलास का ? माधुरीचं लग्न झालं. माधुरी दीक्षितचं... हे ऐकून आम्ही सगळे चकीत झालो होतो. अशा भन्नाट गोष्टी तेव्हा घडायच्या, शेवटी त्यांना पुन्हा आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आता नाव सांगायची डेअरिंग करणार नाही. माझा संसार अगदी व्यवस्थित सुरू आहे." त्यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तुम्काराम मुंढे यांच्या सारख्या कडक अधिकाऱ्याच्या या हजरजबाबी बाजूने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.