पुणे, दि. ९ : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या यंदाच्या १३५ व्या गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात ऑगस्ट क्रांती दिनाच्या मुहूर्तावर झाली. गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनासह यंदाच्या देखाव्याचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर येथे रविवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात पोलिस उपायुक्त झोन-१ क्रुषिकेश रावले आणि अशोक इलेक्ट्रिकलचे अशोकभाई शहा व उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते उत्सव मंडपाचे विधीवत व पारंपारिक पद्धतीने वासा पूजन करण्यात आले. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचे अनावरण करण्यात आले.
यंदा ट्रस्टकडून ‘श्री गणेश सुवर्णधाम’ हा आकर्षक देखावा उभारण्यात येणार आहे. पार्वतीनंदन शिवपुत्र श्री गणेशाची वास्तू जिथे ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या भारतीय संस्कृतीतील विचारांचा आचार-विचार केला जातो, या संकल्पनेवर आधारित हा देखावा असणार आहे. आई-वडिलांप्रती कृतज्ञता, त्यांचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजनाची परंपरा या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात येणार आहे.
दरवर्षी काल्पनिक विषयांवर आधारित देखावे सादर करणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यंदाही गणेशभक्तांना वेगळा आणि संदेश देणारा देखावा पाहायला मिळणार आहे. १३५व्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वासा पुजन सोहळ्यासाठी व देखावा अनावर प्रसंगी अनेक मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल- ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने वातावरण उत्सवमय झाले होते.
*"क्रांतिकारकांचा गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या सजावटीचे वासापूजन आणि देखावा अनावरण क्रांतीदिनी झाले. यावर्षी श्री गणेश सुवर्णधाम हा काल्पनिक देखावा उभारला जाणार आहे. यावर्षीचा उत्सव हा धार्मिक, पावित्र्य आणि परंपरा जोपासून साजरा केला जाणार आहे. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही डिजेमुक्त गणेशोत्सव आणि दहीहंडी आम्ही साजरी करणार आहोत."*
*- पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त*
*"श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या १३५ व्या गणेशोत्सव मंडपाच्या वासा पूजनाचा मान मला मिळाला याचा अत्यंत आनंद आहे. गतवर्षीही या मंडळाचा उत्सव मी पाहिला होता, कार्यकर्त्याचा उत्साह आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्त पाहिल्यानंतर पुण्याचा गणेशोत्सव आगळा वेगळा का आहे हे कळले. वासा पूजनाचा बहुमान दिल्याबद्दल ट्रस्टचा मनापासून आभारी आहे."*
- क्रुषिकेश रावले, पोलिस उपायुक्त झोन-१.