उडुपी : देशातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना कर्नाटकात घडली आहे. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी उडुपी जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कंत्राटदार आणि ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष डेविड डिसूझा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी डिसूझा यांच्यावर धाड-धाड गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला चकमकीत जखमी अवस्थेत अटक केली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
शुक्रवारी सकाळी उडुपीतील एका वर्दळीच्या भागात ही घटना घडली. मोटारसायकलवरून आलेले दोन हल्लेखोर अचानक डेविड डिसूझा यांच्याजवळ आले आणि त्यांनी त्यांच्यावर 3 राऊंड गोळ्या झाडल्या. गोळ्या लागून डिसूझा जागीच कोसळले. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून शोध सुरू केला. हल्ल्यातील मुख्य शूटर राजू याला बिंदूरजवळील ओट्टिनाने परिसरात पोलिसांनी घेरले. त्याने पोलिस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी आत्मरक्षणार्थ गोळीबार केला. यात राजूच्या उजव्या पायाला गोळी लागली. त्याला पुढील उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या कटात सहभागी असलेले इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या 5 पेक्षा जास्त पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे. चकमकीदरम्यान एसआय तेजस्वी हे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेविड डिसूझा हे केवळ काँग्रेस नेते नव्हते तर ते एक मोठे कंत्राटदार आणि आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्षही होते. राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या हत्येमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे.
प्राथमिक तपासात ही हत्या "आर्थिक वादातून" झाल्याचे सांगितले जात आहे. डिसूझा यांच्या काही कंत्राटांवरून वाद होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष दिलेला नाही. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "आम्ही या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करत आहोत. राजकीय कारण, वैयक्तिक वैमनस्य आणि आर्थिक व्यवहार या सर्व अँगलने तपास सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत."
या हत्येनंतर कर्नाटक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. सध्या उडुपी परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या हत्येमागील खरे कारण आणि फरार आरोपी कधी पकडले जातात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.z