सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके संतापले, भेटीसाठी येणाऱ्यांना पोलिसांशी बाचाबाची, व्हिडीओमुळे नवी चर्चा - टॉप न्यूज मराठी

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दिल्लीतील आंदोलनानंतर ते थेट छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर दोन दिवस पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे पुढील धोरण आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका पोलिस अधिकाऱ्याशी वाद घालताना दिसत आहेत.

व्हिडीओतील संभाषण काय 

भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला.

"मी सीपी साहेबांना बोलतो... तुम्हाला काय त्रास आहे? आजपर्यंत कधीच प्रॉब्लेम झाला नाही. आम्ही तुम्हाला आजच बघतोय," असे ते पोलिस अधिकाऱ्याला म्हणाले.

"कोणत्या विभागाचे आहात? कोणते पोलीस स्टेशन? पद कोणते? नाव काय आहे? नाव लिहून घ्या," असे प्रश्न त्यांनी विचारले.

"तुम्ही कोण सांगणार मी कोणाला भेटायचे? मी ठरवणार आहे. लोकं मला भेटायला येत आहेत आणि मी ज्यांना आत घेत आहे. तुम्ही बाहेर जा सर प्लीज," असे म्हणत त्यांनी त्या अधिकाऱ्याला घराबाहेर जाण्यास सांगितले.

व्हिडीओमध्ये संबंधित पोलिस अधिकारी हे वरिष्ठ असल्याचे दिसत आहे. अखेर ते अधिकारी तेथून बाहेर गेले.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी "भाऊ पब्लिकसाठी पोलिसांनाही सोडत नाही" असे म्हणत अभिजीत दिपके यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर काहींनी "वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असे वागणे योग्य नाही" आणि "अति होत आहे" अशी टीकाही केली आहे. सध्या या प्रकरणावर पोलिस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.