कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांची मोठी घसरण; ५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? - टॉप न्यूज मराठी

जागतिक बाजारातून भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव कमालीचा निवळल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्याकिमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन आणि 'ब्रेंट' कच्च्या तेलाचे दर थेट ५ टक्क्यांपर्यंत खाली कोसळले असून, ते गेल्या ५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. जागतिक बाजारातील या घसरणीमुळे भारतीय बाजारपेठेत आणि सर्वसामान्यांमध्ये इंधन दर कपातीची आशा निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मध्यपूर्वेतील युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली होती, ज्यामुळे तेलाचे दर गगनाला भिडले होते. मात्र, आता हा तणाव कमी झाल्याने तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ७३ डॉलरच्या आसपास आले आहेत. या घसरणीमुळे भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणाऱ्या देशाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल ८५ टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो.

जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असले तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत त्वरित घट होण्याची शक्यता कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील इंधनाचे दर हे केवळ कच्च्या तेलावर अवलंबून नसून, ते डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर, केंद्र सरकारचा अबकारी कर/एक्ससाईज ड्यूटि आणि राज्य सरकारांचा व्हॅट यांवर ठरवले जातात. तसेच, सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) आंतरराष्ट्रीय दरांच्या पंधरवड्याच्या सरासरीचा अभ्यास करून निर्णय घेतात.

लगेच कपात होणार नसली, तरी कच्च्या तेलाचे दर पुढील काही आठवडे याच पातळीवर राहिले, तर आगामी सणासुदीच्या काळात किंवा दिवाळीच्या तोंडावर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २ ते ३ रुपयांनी कमी करू शकतात. इंधन दर कमी झाल्यास देशातील मालवाहतुकीचा खर्च कमी होईल, ज्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.