महत्वाचे : मॅग्नेट प्रकल्पाच्या नावाने सुरू आहेत फसवणुकीचे मेसेज ! प्रकल्प प्रशासनाचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांनी सावध राहावे - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क' म्हणजेच मॅग्नेट प्रकल्पाच्या नावाने सध्या सोशल मीडियावर फसवे मेसेज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. "प्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक, गुंतवणुकीवर मोठा परतावा" अशा आशयाचे संदेश फिरत असल्याने प्रकल्प प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.

प्रकल्प संचालकांनी स्पष्ट केले आहे की, व्हायरल होणाऱ्या या बातम्या आणि मेसेजचा अधिकृत मॅग्नेट प्रकल्पाशी कोणताही संबंध नाही. शेतकरी आणि नागरिकांनी अशा तोतयेगिरीला आणि भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे मॅग्नेट प्रकल्प ?

मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाची काढणीनंतर होणारी नासाडी कमी करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. यात फळपिके आणि फुलपिकांवर भर देण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र शासन हा प्रकल्प राबवत आहे.

या प्रकल्पांतर्गत राज्यातील 14 प्रमुख फळपिके आणि विविध फुलपिकांसाठी संपूर्ण मूल्यसाखळी उभी केली जाणार आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

1.  उत्पादन: नवीन वाणांचा प्रसार आणि रोपवाटिका विकास

2.  संघटन: शेतकरी उत्पादक संस्थांचे सक्षमीकरण  

3.  तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन

4.  प्रक्रिया आणि बाजार: प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ विकास

5.  पायाभूत सुविधा: नवीन आणि विद्यमान सुविधा उभारणे

प्रकल्पासाठी शेतकरी उत्पादक संस्थांसह गुंतवणूकदारांनाही अर्थसहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ याच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावणार आहे.

प्रशासनाचा महत्वाचा इशारा

मॅग्नेट प्रकल्प प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे की, प्रकल्पात गुंतवणूक केल्यास व्याज किंवा कोणत्याही प्रकारचा परतावा देण्याचे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे "मोठ्या परताव्याचे" आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहावे. प्रकल्पाबद्दल अधिकृत आणि खरी माहिती फक्त प्रकल्पाच्या https://magnetadb.com/ या वेबसाईटवरच उपलब्ध आहे, असे प्रकल्प संचालकांनी सांगितले आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करून घ्या आणि अफवांना बळी पडू नका.