“गुंगी गुडिया” वाद पेटला ! सपकाळ म्हणाले “हे स्पष्टीकरण आहे शिवी नाही”, सत्ताधाऱ्यांचा जोरदार पलटवार, राज्याच्या राजकारणात खळबळ - टॉप न्यूज मराठी

मुंबई : काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” म्हटल्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलेल्या या पोस्टनंतर सत्ताधारी पक्षांनी एकत्र येत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या वादात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उडी घेत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी “गुंगी गुडिया” या शब्दामागील कारण सांगितले. ते म्हणाले की, लोकशाहीत एखाद्या सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने जनतेच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाणे अपेक्षित आहे. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने पत्रकारांना एकेरी भाषेत “चूप बस” म्हटले. त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्याला विरोध न करता मौन बाळगले. याच भूमिकेवर टीका करण्यासाठी आम्ही “गुंगी गुडिया” हा शब्द वापरला. हा कोणताही वैयक्तिक अपमान नाही तर त्यांच्या सार्वजनिक भूमिकेवर केलेली राजकीय टीका आहे, असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिले.

सपकाळ यांनी पुढे जात थेट आव्हानही दिले. ते म्हणाले की, “गुंगी गुडिया हा शिवीगाळ करणारा शब्द नाही. इंदिरा गांधींनाही सुरुवातीला असेच म्हटले जायचे. पण त्यांनी नंतर आपल्या कामातून उत्तर दिले आणि त्यांनाच लोह महिला आणि दुर्गा म्हटले गेले. जर सुनेत्रा पवारांनाही दुर्गा म्हणवून घ्यायचे असेल तर त्यांनी अर्थ खाते आपल्याकडे घ्यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, स्मार्ट मीटरचा प्रश्न सोडवावा आणि अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल जाहीर करावा.” आम्ही केलेल्या टीकेला त्यांनी समजून घ्यावे, आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असेही सपकाळ ठामपणे म्हणाले.

सपकाळ यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षातील नेते चांगलेच संतापले आहेत. शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी म्हटले की, महिला नेतृत्वाचा अपमान करणे हे काँग्रेसचे जुने धोरण आहे. मंत्री दत्ता भरणे आणि हसन मुश्रीफ यांनीही या शब्दप्रयोगाचा निषेध केला असून काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपचे नवनाथ बन म्हणाले की, “गुंगी गुडिया कोण होते हे देशाने काँग्रेसच्या काळात पाहिले आहे.” 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. उदयकुमार आहेर यांनी म्हटले की, सुनेत्रा पवारांचा अपमान म्हणजे बारामतीकरांचा आणि पवार कुटुंबाचा अपमान आहे. शरद पवारांनी काँग्रेसला जाहीर माफी मागायला लावी अन्यथा इंडिया आघाडीतून बाहेर पडावे. शरद पवार गटाचे उमेश पाटील म्हणाले की, काँग्रेसने असंवेदनशील वक्तव्य करून त्यांच्याच नेत्या इंदिरा गांधींची टिंगल उडवली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेस शोकात असताना दुसरीकडे “गुंगी गुडिया” या एका शब्दामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. आता काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहते का आणि सत्ताधारी यावरून आंदोलनाची भूमिका घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.