महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा उत्तुंग ठसा उमटवणारे जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, देशातील शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील, अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचं आज वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील 'ज्ञानशांती' या निवासस्थानी निधन झालं आहे.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. कोल्हापूरच्या एका साध्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास... देशातील एका विशाल शैक्षणिक आणि आरोग्य साम्राज्याच्या रूपात उभा राहिला. आज या 'ज्ञानपर्वाचा' अस्त झाला आहे.राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा एक दिलदार नेता, आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे उघडी करून देणारा 'शिक्षणमहर्षी' आज आपल्यात नाही. पाहूयात डॉ. डी. वाय. पाटील यांचं योगदान आणि संपूर्ण जीवन प्रवास...
२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 'आंबप' या एका साध्या शेतीप्रधान गावात ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचा जन्म झाला. एका बहुजन शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र आणि उत्तुंग ओळख निर्माण केली.त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी कोल्हापूरचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.काँग्रेस पक्षाशी त्यांची निष्ठा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता, केंद्र सरकारने त्यांची सर्वोच्च प्रशासकीय पदांवर नियुक्ती केली. २००९ ते २०१३ या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल, तर २०१३ ते २०१४ या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली. या दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला. राजकारणात राहिले, पण पदांपेक्षा त्यांनी जनसेवेला आणि शिक्षणाला कायम प्राधान्य दिलं.वयाच्या ४५ व्या वर्षी सक्रिय राजकारणातून काहीसा संन्यास घेत, डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा वटवृक्ष उभारण्यास सुरुवात केली. १९८३ मध्ये त्यांनी नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' (RAIT) या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. महाराष्ट्रात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे खाजगीकरण करून ते ग्रामीण आणि सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अग्रदूत म्हणूनच भूमिका बजावली.आज त्यांच्या 'डी. वाय. पाटील ग्रुप' अंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये ३ डीम्ड युनिव्हर्सिटीज, ६ खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट, नर्सिंग ते कृषी क्षेत्रापर्यंत या संस्थांचे विशाल जाळे पसरले आहे.१९९४ ते १९९७ या काळात त्यांनी 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे' (AICTE) अध्यक्षपद भूषवत देशाच्या तांत्रिक शिक्षण धोरणाला नवी दिशा दिली होती. शिक्षण आणि समाजसेवेतील या अफाट योगदानासाठी भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून त्यांना मानद डी.लिट पदवीने गौरविण्यात आले होते.केवळ शिक्षणच नाही, तर आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी क्रांती घडवली. नवी मुंबईतील नेरुळ येथील 'डी. वाय. पाटील स्टेडियम' हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम प्रतीक आहे. जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल आणि फुटबॉलचे मोठे सामने खेळवले जातात.
यासोबतच सामाजिक भान जपत त्यांनी नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल्स उभारली, जिथे आज हजारो गरीब रुग्णांवर मोफत आणि अत्यल्प दरात उपचार केले जातात.शेगावच्या श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेले डॉ. डी. वाय. पाटील आपल्या सर्व यशाचे श्रेय संतांच्या आशीर्वादाला देत असत. प्रचंड लोकसंग्रह आणि अथांग अध्यात्म ही त्यांची खरी ताकद होती. आज त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार डॉ. संजय डी. पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू आमदार ऋतुराज पाटील हे सर्वजण हा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा पुढे चालवत आहेत.डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी येताच राजकीय आणि सामाजिक विश्वातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.एका साध्या गावातून सुरू झालेला प्रवास... आणि त्या प्रवासातून लाखो-करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्याला मिळालेली नवी दिशा... डॉ. डी. वाय. पाटील आज आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी उभारलेला हा ज्ञानाचा, आरोग्याचा आणि क्रीडेचा वटवृक्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना अशीच सावली देत राहील.