पुणे विमानतळावरून आता आणखी उड्डाणे ! अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण वापर करणार - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या सहकार्यामुळे मिळालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्ताराला प्राधान्य देणार असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हवाई दलाने वाढवली स्लॉटची मर्यादा

पुणे विमानतळावरील गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मोहोळ यांनी 19 मार्च 2025 रोजी भारतीय हवाई दलाकडे स्लॉट वाढवण्याची अधिकृत मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून हवाई दलाने 30 मे 2025 पासून पुणे विमानतळावरील दैनंदिन विमान हालचालींची कमाल मर्यादा 220 वरून 235 पर्यंत वाढवली आहे. या निर्णयामुळे पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी आणि नवीन उड्डाणांसाठी मोठा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या कोणत्या कंपन्या सेवा देतात ?

सध्या इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर, स्पाइसजेट, फ्लाय91, स्टार एअर आणि अलायन्स एअर या 8 विमान कंपन्या पुण्यातून सेवा देत आहेत. वाढीव स्लॉटची माहिती सर्व कंपन्यांना देण्यात आली असून त्यांच्या मुख्यालयांसोबत समन्वय साधून पुण्यातून नवीन शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची आणि सध्याच्या मार्गांवरील फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे मोहोळ म्हणाले.

2 ऑगस्टचा आकडा काय सांगतो ?

2 ऑगस्ट 2026 रोजी पुणे विमानतळावर एकूण 214 विमान हालचाली नोंदल्या गेल्या. त्यात 107 आगमन आणि 107 प्रस्थानाचा समावेश होता. त्या दिवशी पुण्यावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून 34 शहरांशी थेट संपर्क होता.  

सर्वाधिक उड्डाणे : दिल्ली - 19, बंगळुरु - 17, चेन्नई - 7, हैदराबाद - 5, अहमदाबाद - 5, गोवा मोपा - 4

इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई आणि बँकॉक मार्गावरील सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे वाढीव स्लॉटचा वापरही लक्षणीय वाढला आहे.