ठाकरेंना पुन्हा धक्का ! कल्याणच्या महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांचा राजीनामा, 'शिंदे गटात जाणार?' चर्चांना उधाण - टॉप न्यूज मराठी

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे पुन्हा वेगाने वाहत आहेत. आधीच 6 खासदारांच्या बंडाने हादरलेल्या शिवसेना UBT ला आता कल्याण लोकसभा मतदारसंघातून आणखी एक झटका बसला आहे. पक्षाच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या महिला नेत्या वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक *वैशाली दरेकर राणे* यांनी तात्काळ प्रभावाने पदाचा राजीनामा दिला आहे. वैशाली दरेकर या कल्याणच्या राजकारणात ठाकरेंच्या चेहऱ्यांपैकी एक होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाच्या तिकिटावर कल्याणमधून उमेदवारीही लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा सामना थेट शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी झाला होता. मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

"वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा" - दरेकरांचे स्पष्टीकरण

राजीनामा दिल्यानंतर वैशाली दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या कि , "माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी संघटनेला वेळ देऊ शकत नाहीये. त्यामुळे मी जिल्हा महिला संघटक पदाचा राजीनामा देत आहे. मी राजीनामा दिला असला तरी शिवसेना UBT ची एक निष्ठावान सदस्य म्हणून काम करत राहणार आहे," असेही दरेकर म्हणाल्या.

ठाकरेंसमोर वाढले आव्हान

गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे पक्ष पुन्हा उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. 6 खासदारांच्या बंडानंतर त्यांनी गावागावात संपर्क वाढवून संघटना मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच कल्याणसारख्या महत्वाच्या मतदारसंघातील एका प्रमुख महिला नेत्याचा राजीनामा म्हणजे ठाकरेंना बसलेला आणखी एक धक्का मानला जात आहे. राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दरेकर नेमका कोणता निर्णय घेणार? त्या शिंदे गटात प्रवेश करणार का? की त्या फक्त संघटनात्मक पद सोडून कार्यकर्त्या म्हणून राहणार? या प्रश्नांची उत्तरं सध्या गुलदस्त्यात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील ही घडामोड ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चा आहे.