समाजाला यश दिसतं,संघर्ष नाही;अमरावतीत तुकाराम मुंढे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद - टॉप न्यूज मराठी

आजच्या २१ व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणाईची दिशाभूल होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. डिजिटल युगात मोबाईल आणि AI मुळे 'ज्ञान' व 'माहिती' प्रत्येकाच्या खिशात उपलब्ध आहे, परंतु समाजात योग्य-अयोग्य ठरवणाऱ्या 'विवेकाची' मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडले. ते अमरावतीत विद्यार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

आजच्या 'Gen-Z' पिढीवर होणाऱ्या टीकेवर भाष्य करताना मुंढे म्हणाले की, तरुण पिढीला आळशी किंवा मोबाईलमध्येच व्यस्त म्हणणे योग्य नाही. रात्रीच्या वेळी मोबाईलवर इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर स्क्रोल करताना तरुण रीलमधील नट-नटी किंवा श्रीमंती पाहून स्वतःची तुलना करू लागतात. मात्र, रीलमध्ये दिसणाऱ्या एका सुंदर फोटोमागे किंवा विनोदामागे २५ ते ५० अपयशी प्रयत्न आणि वर्षानुवर्षांचा सराव असतो, जो कधीच समोर येत नाही. या अनैसर्गिक आणि आभासी तुलनेमुळे तरुणांमध्ये न्यूनगंड तयार होत असून, तो आजच्या पिढीपुढील सर्वात मोठा धोका आहे.

स्वतःचे उदाहरण देत तुकाराम मुंढे म्हणाले, "१९९७ ते १९९९ या तीन प्रयत्नांत मला केवळ मुलाखतीपर्यंतच पोहोचता आले होते. त्यानंतर २००० मधील 'एमपीएससीचा' निकाल २००३ मध्ये आला आणि २००४ च्या प्रयत्नात माझी 'आयएएस' म्हणून अंतिम निवड झाली. आज लोकांना फक्त यश दिसते, पण त्यामागील अपयशाचा अभ्यास कोणी करत नाही. यशामागील संघर्ष न समजता न्यूनगंडातून चुकीचे निर्णय घेणे ही मोठी शोकांतिका ठरेल.