एसएनडीटीतील ५० गरजू विद्यार्थिनींना वर्षभर मोफत पौष्टिक भोजन; तीन संस्थांचा सामाजिक उपक्रम - टॉप न्यूज मराठी

पुणे, दि. १ ऑगस्ट : पुण्यातील एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना दररोज मोफत पौष्टिक दुपारचे भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि., गुडविल इंडिया आणि एसएनडीटी महाविद्यालय या तीन संस्थांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासंदर्भातील एक वर्षाच्या सामंजस्य करारावर शनिवारी (दि. १ ऑगस्ट) अनंत डिफेन्स सिस्टीम्सचे प्रमुख चेतन धारिया, गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे आणि एसएनडीटीच्या प्राचार्या डॉ. भरत व्हनकटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या करारानुसार आजपासून पुढील एक वर्ष महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना दररोज मोफत पौष्टिक दुपारचे भोजन दिले जाणार आहे. या भोजनाचा संपूर्ण आर्थिक भार अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि. उचलणार असून, गुडविल इंडिया ही सामाजिक संस्था विद्यार्थिनींना पौष्टिक भोजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

करार सोहळ्याला अनंत डिफेन्स सिस्टीम्सच्या वतीने संचालक गिरीश बुटाला, संचालिका लिना धारिया, दिशा धारिया आणि रूचा जोशी उपस्थित होत्या. गुडविल इंडियाच्या वतीने विश्वस्त संपदा अलाटे, अनिश मोरे, रजनी मोरे, विवेक विप्रदास आणि प्रसाद घारे उपस्थित होते. तसेच एसएनडीटीच्या वतीने उपप्राचार्या डॉ. अंजली कदम, डॉ. मृणालिनी घाटगे आणि डॉ. प्राजक्ता भडगांवकर यांनीही उपस्थिती लावली.

यावेळी चेतन धारिया म्हणाले, "आज या उपक्रमाच्या निमित्ताने तीन संस्थांचा त्रिवेणी संगम झाला आहे. हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील."

गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे म्हणाले, "गरजू विद्यार्थिनींना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी तीन संस्था एकत्र आल्या, ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होते."

प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे म्हणाले, "या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याला निश्चितच लाभ होईल. रोजच्या जेवणाची चिंता दूर झाल्याने त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही चालना मिळेल."

कार्यक्रमाच्या प्रारंभी एसएनडीटी महाविद्यालयाच्या वतीने चेतन धारिया आणि कालिदास मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना खळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्या डॉ. अंजली कदम यांनी केले.