पुणे : राज्यातील ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांसाठी शासनाने मोठी योजना आणली आहे. महाराष्ट्र शासनाने मंडळाच्या नावात आणि नियमात बदल करून आता त्याला ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे नवीन नाव दिले आहे.
या मंडळाचा उद्देश ऑटो आणि टॅक्सी चालकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व पात्र चालकांना मंडळाचे सभासद होण्याचे आवाहन केले आहे.
सभासदत्वासाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. घरी बसूनही अर्ज करता येईल.
1. वेबसाईट: https://ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. ऑनलाइन अर्ज: तिथे दिलेल्या लिंकवरून नोंदणी फॉर्म भरा.
3. शुल्क: नोंदणी आणि ओळखपत्रासाठी 500 रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये असे एकूण 800 रुपये भरावे लागतील.
मंडळामार्फत चालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत.
1. सन्मान निधी: 65 वर्षे वय पूर्ण झालेल्या चालकांना दरमहा सन्मान निधी दिला जाईल.
2. विमा संरक्षण: कर्तव्यावर असताना अपघात झाल्यास जीवन विमा आणि अपंगत्व विमा मिळेल.
3. आरोग्य लाभ: चालक आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्यविषयक मदत आणि तपासणी शिबीर घेतली जातील.
4. अपघातग्रस्तांना मदत: कामावर असताना दुखापत झाल्यास तातडीचे अर्थसाहाय्य दिले जाईल.
5. शिष्यवृत्ती: चालकांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार आहे.
6. कौशल्य प्रशिक्षण: नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षित वाहतुकीचे प्रशिक्षण दिले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व ऑटो रिक्षा चालक, मीटर टॅक्सी चालक आणि प्रवासी वाहतूक करणारे परवाना धारक चालक या मंडळाचे सभासद होऊ शकतात. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, शासनाच्या या योजनांचा जास्तीत जास्त चालकांनी लाभ घ्यावा. 800 रुपयांच्या सभासद शुल्कातून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. आजच ऑनलाइन नोंदणी करा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांशी जोडा.