पुणे : मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यासाठी मराठी भाषा विभागामार्फत भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे संमेलन ऐतिहासिक असल्याने ते जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शतक महोत्सवी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाची शंभर वर्षांची परंपरा ही मराठी समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. अनेक साहित्यिक, कवी, लेखक आणि ग्रामीण भागातील साहित्यसेवकांनी या परंपरेला समृद्ध केले आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि सातारा येथील संमेलनांसाठी प्रत्येकी 3 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्याच धर्तीवर शंभरावे संमेलनही भव्य होईल.
पुढील काळासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्याने परदेशात होणाऱ्या 12 साहित्य संमेलनांसाठी निधी दिला जाईल.
युवा साहित्य संमेलन आणि 99 वे साहित्य संमेलन यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे.
मराठी भाषा विभागाचे दालन उभारणीसाठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
नवी दिल्लीतील संमेलनात ग्रामीण साहित्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आगामी संमेलनात शहरी साहित्याबरोबरच ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्राधान्याने स्थान द्यावे, असे सामंत यांनी सांगितले.
बोलीभाषा टिकवण्यासाठी केवळ परिसंवाद पुरेसे नाहीत. त्यांचे शब्दकोश तयार होणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतील. साहित्य संमेलने ही भाषेच्या सन्मानाची व्यासपीठे आहेत. त्यात बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावर्षीपासून जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत आणण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने 'अनुवाद समिती' स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र निधी दिला जाईल. तसेच 'अभिजात सप्ताहा'निमित्त राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये 'माझी मराठी, अभिजात मराठी' हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमात राज्य मराठी विकास संस्थेमार्फत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बळकटीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात बैठक घेतली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले की, शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती महामंडळाच्या मदतीने विविध उपक्रम राबवले जातील. समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी देशभरातील बृहन्महाराष्ट्र मंडळांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी आणि जागतिक स्तरावरील साहित्य संमेलनांसाठीही निधी द्यावा, अशी मागणी केली. मराठी भाषेची व्यापक चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.