" बीजेपीमध्ये सामील झाला तर बरं आहे नाही तर..", आंदोलनानंतर परतलेल्या अभिजीत दीपकेंचा भाजपवर गंभीर आरोप - टॉप न्यूज मराठी

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि नुकत्याच झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके हे आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले आहेत. घरी परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत काही गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून आपल्याला आणि कुटुंबाला थेट धमक्या देण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला आहे.

"भाजपमध्ये या नाहीतर बघून घेऊ" 

माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले कि, "मला भाजपकडून अनेक ऑफर्स आल्या होत्या. पण मला जायचे असते तर मी आधीच गेलो असतो. आंदोलन मागे घ्या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या मला आल्या.भाजपमध्ये सामील झाला तर चांगलं आहे, नाहीतर ठोकू, गोळ्या घालू' अशी भाषा वापरली गेली. ही भाजप आणि संघाची 'प्रेमाची भाषा' आहे का?" असे खळबळजनक आरोप अभिजित दीपके यांनी केले आहेत. 

दीपके यांनी यावेळी आपल्या कुटुंबालाही धमकी मिळाल्याचे सांगितले. "आई-बाबांचं बघून घेऊ, घरी जाऊन भेटू असंही सांगण्यात आलं. मी 30 वर्षांचा आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवाच्या वयाच्या मुलाला धमक्या देता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे," अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

भाजपने आरोप फेटाळले 

अभिजीत दीपके यांच्या या आरोपांना भाजपने तात्काळ उत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

"भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणालाही धमक्या देण्याची गरज नाही. दीपके यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. एखादे आंदोलन केले की प्रसिद्धी मिळते आणि त्यानंतर वाट्टेल ते बोलण्याचा परवाना मिळत नाही. आंदोलनाला चेहरा मिळाला म्हणून जबाबदारी वाढते. भाजपकडून त्यांना कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. फक्त नाव मोठे झाले म्हणून भाजपवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनता हे स्वीकारणार नाही," अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय ?

कॉकरोच जनता पार्टीने अलीकडेच काही स्थानिक मुद्द्यांवरून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे अभिजीत दीपके चर्चेत आले होते. आंदोलनानंतर ते काही दिवस बाहेर होते आणि आता ते छत्रपती संभाजीनगरला परतले आहेत. दीपके यांच्या आरोपांमुळे आणि भाजपच्या खंडनामुळे राज्याच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस किंवा इतर कोणत्या यंत्रणेकडून अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबत अद्याप माहिती नाही.