पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात घरभाड्याने राहणाऱ्या लोकांची माहिती आता थेट स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी लागणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अंतर्गत मिळालेल्या अधिकारानुसार अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व घरमालकांना नवीन भाडेकरू ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
1. भाडेकरूचे संपूर्ण नाव
2. सध्याचा आणि मूळचा पत्ता
3. दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
4. भाडेकरूला ओळखणाऱ्या दोन व्यक्तींचे नाव व पत्ता
5. घरभाडे करारनामा
6. ओळखपत्राची प्रत
निर्धारित वेळेत माहिती सादर न केल्यास संबंधित घरमालकावर भारतीय न्याय संहितेचे कलम 223 नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. स्थानिक पोलीस स्टेशननी याबाबत प्राप्त माहितीची नोंद घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. गुन्हेगारी रोखणे आणि संशयितांची माहिती तातडीने मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.