कंगनाचा गटार क्लास वक्तव्यावरुन यु-टर्न ; " रस्त्यावर अनैतिक आणि अश्लील वर्तन करणाऱ्यांना मी सामान्य मानू शकत नाही.." - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत Kangana Ranavat यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद पेटण्याची शक्यता आहे. जेनझी पिढीवर केलेल्या टीकेनंतर कंगनावर सर्वत्र टीका होत असतानाच, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने CJP केलेल्या मोठ्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. आंदोलन संपून काही दिवसही झाले नाहीत तोवरच अभिजीत दिपके यांनी सरकारला नव्याने इशारा दिला. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहोत, असे दिपके म्हणाले. यावेळी त्यांनी कंगना राणावत यांच्या अलीकडील विधानावरही जोरदार टीका केली.

कंगना राणावत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जेनझी आंदोलकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी काही आंदोलकांना गटार क्लास म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या की, रस्त्यावर अनैतिक आणि अश्लील वर्तन करणाऱ्यांना मी सामान्य मानू शकत नाही. अशा गोष्टी आमचा समाज स्वीकारणार नाही. या विधानानंतर देशभरातून कंगनावर टीकेची झोड उठली. अनेक नेते, संघटना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिचा निषेध केला.

वाद वाढल्यानंतर कंगनाने व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली की, मी सर्व जेनझींबद्दल बोलले नाही. काही विशिष्ट लोकांच्या वर्तनावरून मी हे विधान केले. समाजात राहायचे असेल तर संविधानाचे पालन करावेच लागेल. स्वातंत्र्य तिथे संपते जिथे दुसऱ्याच्या नाकाला आणि कानाला त्रास होतो. उद्धट आणि असभ्य वर्तन फक्त घरातच चालू शकते, रस्त्यावर नाही. पुढे ती म्हणाली की, स्त्रियांवर सन्मान राखण्याचा एवढा मोठा भार का टाकला जातो. तुम्ही तुमच्या मुलीलाही हेच शिकवणार का. मी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. माझ्या टीममध्ये आणि नातेवाईकांमध्ये अनेक जबाबदार तरुण आहेत जे चांगले काम करत आहेत.मी स्कायरूट सारख्या स्टार्टअप्सचे कौतुक केले होते पण माध्यमांनी त्याचा उल्लेख केला नाही. काही लोक फक्त वादासाठी पूर्ण बुलेटिन काढत आहेत. 

दरम्यान अभिजीत दिपके यांनी कंगनाच्या विधानाला चुकीचे ठरवत जेनझींचा अपमान सहन केला जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. सध्या कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यावरून चर्चा सुरू आहे.