अरे बापरे हे काय म्हणाली कंगना ! 'जनरेशन गटर' वक्तव्याने कंगना रणौत पुन्हा वादात, नेटकऱ्यांचा संताप - टॉप न्यूज मराठी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या थेट आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. सीजेपी आंदोलनावर टीका केल्यानंतर आता तिने इंस्टाग्राम स्टोरीवर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा मोठा वाद पेटला आहे. आजच्या पिढीतील स्वतंत्र महिलांबद्दल तिने अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने सोशल मीडियावर तिच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली?

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "तरुण हिंदू स्त्रियांसाठी सर्वात लज्जास्पद बाब म्हणजे स्वतंत्र करिअर असलेल्या स्त्रियांचं अनुकरण करण्याची इच्छा. खऱ्या स्वतंत्र स्त्रिया स्वतःचा मार्ग तयार करतात आणि सर्व जबाबदाऱ्या स्वतः निभावतात. त्या पालकांच्या बळावर जगत नाहीत."

त्यानंतर तिने आजच्या पिढीतील महिलांना थेट "जनरेशन गटर" असं संबोधलं. "मी त्यांना गटर पिढी म्हणते. ही वेस्टर्न कल्चर स्वीकारलेली नवी पिढी आहे. यांचा ना अभ्यास चांगला, ना त्या सुंदर, ना त्यांची मानसिकता चांगली. या इतक्या भ्रष्ट आहेत की चांगल्या गृहिणीही होऊ शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं काही नसताना ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य गर्वाने दाखवतात," असा आरोप तिने केला.

कंगना पुढे म्हणाली, "या मुली स्वतंत्र न होताही स्वतंत्रतेचा दिखावा करतात आणि निर्लज्जपणे आई-वडिलांच्या कमाईवर जगतात. जबाबदारी न घेता स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुम्ही बिघडलेल्या विचारांच्या गटर छाप व्यक्ती आहात."

नेटकऱ्यांचा संताप अनावर

कंगनाच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया संतापाने भरला आहे. रेडिट आणि इतर प्लॅटफॉर्मवर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

एका युजरने लिहिलं, "मला वाटत नाही की कोणीही याच्याशी सहमत होईल."  

दुसऱ्याने खोचकपणे म्हटलं, "जे तिने स्वतः आयुष्यात केलं, त्यासाठीच आता ती दुसऱ्यांना लाजवतेय."  

आणखी एकाने कमेंट केली, "तिने इथे पोहोचण्यासाठी काय काय केलं ते बहुतेक विसरली असेल."  

तर एका युजरने थेट म्हटलं, "तिचा मेंदू खराब झाला आहे, दुसरं काही नाही."

महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि करिअरवर केलेल्या या टीकेमुळे कंगनावर पुन्हा एकदा स्त्रीद्वेषी असल्याचा आरोप होत आहे. सध्या या प्रकरणावर कंगनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.