मुंबई : राज्यात MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात थेट आरोप केल्यानंतर तपासाला वेग आला आहे.
कौटिल्य अकॅडमीच्या संचालकाने पेपर पालकांना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत नावे आणि पुरावे दिल्यानंतर अकॅडमीचे संचालक ऋषिकेश गांगर्डे हे 'नॉट रिचेबल' झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक नंदुरबारला रवाना झाले आहे.
पोलिसांनी तक्रारदार आणि ज्या उमेदवार विद्यार्थिनीचे गुण वाढले आहेत तिला देखील चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार म्हणाले, "भाजप सरकार आलं तेव्हापासून वेगवेगळ्या 15 विभागांचे पेपर फुटल्याचे आम्ही दाखवले आहे. CET चा पेपरही फुटत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही MPSC ला सर्व पुरावे दिले. त्यांनी ते गृहखात्याला दिले. संध्याकाळीच एवढी जलद हालचाल झाली. यावरून गृहखात्यात कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न पडतो. या प्रकरणाची फॉरेन्सिक ऑडिट व्हायला हवी. ज्यांची नावे दिली आहेत त्यांचे WhatsApp चॅट पुन्हा मिळवले पाहिजेत. जोपर्यंत चॅट मिळत नाही तोपर्यंत पेपर किती जणांपर्यंत गेला हे कळणार नाही.पैसे देऊन अधिकारी होत असतील तर लोकांच्या समस्या वाढतील. यात आम्हाला राजकारण करायचे नाही. ही संस्था चांगली राहावी अशीच आमची इच्छा आहे," असेही ते म्हणाले.
1. CJP आंदोलन: पोलीस महासंचालकांना भेटून CJP प्रकरणी दाखल 1500 गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. "महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, इथे गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो," असे ते म्हणाले.
2. राजकीय भेटी: शरद पवार पंतप्रधान मोदींना आणि सुप्रिया सुळे अमित शाह यांना भेटल्या. मात्र शरद पवार NDA सोबत जाणार नाहीत. "आम्ही रस्त्यावरची लढाई लढू," असा इशारा रोहित पवारांनी दिला.
3. खड्ड्यांचा मुद्दा: राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. WhatsApp चॅट आणि इतर पुराव्यांच्या आधारे आणखी कोणाची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.