धक्कादायक : पंजाबच्या संगरूरमध्ये भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, मोठे नुकसान; नेमके काय घडले ? - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : देशभरात सध्या NEET पेपर फुटीबाबत आंदोलालने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान आता  पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर रविवारी पहाटे पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोरांनी बियरच्या रिकाम्या बाटलीत पेट्रोल भरून त्याचा बॉम्ब तयार केला आणि तो भाजप कार्यालयाच्या मुख्य भिंतीवर फेकला. बॉम्ब भिंतीवर आदळताच मोठा आवाज झाला आणि त्यानंतर कार्यालयाला आग लागली. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे कार्यालयाच्या बाहेरील भाग आणि काही फर्निचरचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

या घटनेचे गांभीर्य ओळखून संगरूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर संगरूरचे पोलीस अधीक्षक दविंदर अत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हल्लेखोरांनी बियर बॉटलचा वापर करून पेट्रोल बॉम्ब बनवला होता आणि त्याद्वारे कार्यालयावर हल्ला केला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यांनी पुढे सांगितले की जो कोणी या घटनेमागे असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही.

दरम्यान पंजाबमध्ये भाजपशी संबंधित कार्यालये आणि नेत्यांच्या मालमत्तांवर हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही. गेल्या महिन्यातही राज्यातील एका भाजप नेत्याच्या दवाखान्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. त्यामुळे पेपर लीक प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी संगरूरमध्ये निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.