चीन आणि अमेरिकेत विक्री घटल्याने ऑडी संकटामध्ये; फॉक्सवॅगनसोबत करणार व्यवसायाची पुनर्रचना - टॉप न्यूज मराठी

जागतिक वाहन क्षेत्रातील नामांकित ब्रँड 'ऑडी' (Audi) सध्या मोठ्या व्यावसायिक संकटाचा सामना करत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत चीन आणि अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ऑडी गाड्यांच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बाजारातील स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी ऑडीला आपली मूळ कंपनी 'फॉक्सवॅगन' (Volkswagen) समूहासोबत मिळून व्यवसायाची व्यापक पुनर्रचना (Restructuring) करावी लागेल, अशी माहिती ऑडीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) युर्गन रिटर्सबर्गर यांनी दिली.

उत्पादन प्रकल्प बंद होण्याची भीती

वाढता उत्पादन खर्च, चिनी कंपन्यांकडून मिळणारे तगडे आव्हान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार शुल्कातील अडथळे यामुळे फॉक्सवॅगन समूहावर मोठा दबाव आहे. जर्मनीमधील नैकार्सल्म (Neckarsulm) येथील ऑडीच्या प्लांटसह फॉक्सवॅगनचे चार मोठे कारखाने २०३० नंतर बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खर्च आटोक्यात आणण्यासाठी ऑडीने या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता आधीच ७५,००० वाहनांनी कमी केली आहे.

महसुलात १० टक्के घसरण

पहिल्या सहा महिन्यांत लॅम्बोर्गिनी, बेंटले आणि डुकाटी या ब्रँड्सचा समावेश असलेल्या ऑडी समूहाचा एकूण महसूल १० टक्क्यांनी घसरून २९.२ अब्ज युरो (सुमारे ३३.३ अब्ज डॉलर्स) वर आला आहे. कंपनीने खर्चावर कठोर नियंत्रण ठेवल्यामुळे ऑपरेटिंग नफा कसातरी ३ टक्क्यांनी वाढून १.१ अब्ज युरो झाला असला, तरी नफ्याचे प्रमाण (Profit Margin) अवघे ३.८ टक्के राहिले आहे. जागतिक मंदी सदृश परिस्थितीमुळे आगामी काळात कंपनीला अत्यंत कठीण निर्णय घ्यावे लागणार असल्याचे संकेत रिटर्सबर्गर यांनी दिले आहेत.