शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्या - जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांचे नाव आले आहे अशा शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरणाची सुलभ प्रक्रिया अशी :

कागदपत्रे घेऊन जा  

केंद्र चालकाला आपला आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील विशिष्ट क्रमांक सादर करावा.

नोंदणी तपासणी 

केंद्र चालक शेतकऱ्यांची Agristack पोर्टलवर नोंदणी तपासेल. नोंदणी नसेल तर त्याच ठिकाणी नोंदणी करून दिली जाईल.

कर्ज तपशीलाची खात्री  

Agristack नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याचा कर्ज खाते क्रमांक आणि थकीत रक्कम संगणकावर दाखवली जाईल. त्याची शेतकऱ्याने खात्री करावी.

बायोमेट्रिक प्रमाणीकरण  

सर्व माहिती बरोबर असल्यास बायोमेट्रिक म्हणजे बोटाचा ठसा देऊन प्रमाणीकरण करावे. त्यानंतर `Agree` आणि `Submit` करून मिळालेली *पावती* शेतकऱ्याने जपून ठेवावी.

महत्त्वाच्या सूचना:

1. आधार क्रमांकाबाबत असहमती असल्यास:  

केंद्र चालक मूळ आधारकार्ड तपासून योग्य क्रमांक नोंदवेल आणि बायोमेट्रिक करेल. चुकीच्या क्रमांकाची नोंद करून तक्रार *जिल्हास्तरीय समितीकडे* पाठवली जाईल. तक्रार पावती शेतकऱ्याला दिली जाईल.

2. कर्ज रक्कम किंवा खाते क्रमांकाबत असहमती असल्यास:  

प्रथम बायोमेट्रिक करावे. नंतर असहमतीची नोंद करून तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठवली जाईल. तक्रार पावती दिली जाईल.

3. बोटाचा ठसा जुळत नसल्यास:  

इतर बोटांचे ठसे 2-3 वेळा वापरून पहावेत. तरीही न जमल्यास `Unable To Authenticate` पर्याय वापरून केंद्र चालक स्वतःच्या बोटांनी प्रमाणीकरण करेल. याबतची तक्रार तहसीलदारांकडे दाखल करता येईल. तक्रार पावती शेतकऱ्याला मिळेल.

कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी हे आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आपले प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.