परभणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील हनुमान मंदिर मैदानावरून कारमधून वासराची चोरी करणाऱ्या टोळीचा नानलपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑटोचालक शेख इसा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवत जिंतूर बायपास येथून चार सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली असून, न्यायालयाकडून आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परभणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी मुदसिर मुख्तार कुरेशी, शेख मोमान तांबोळी, मोहम्मद शोएब कुरेशी आणि उमर फारूक कुरेशी या चार २४ ते २६ वयोगटातील तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या टोळीने बळजबरीने वासराला कारमध्ये टाकून पळवून नेलं होतं. दरम्यान, या टोळीकडून जनावरे चोरीचे अन्य काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.