नवं पुणे पर्याय ठरणार का ? प्रसिद्ध व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांची विशेष मुलाखत - टॉप न्यूज मराठी

प्रश्न : मी पार्श्वभूमी आणि दोन बातम्यांचा उल्लेख केला. पुण्याच्या विकासाबद्दल आणि विस्ताराबद्दल बोलताना पुण्याची लोकसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या या शहराची लोकसंख्या ५० लाखांच्या पार गेली आहे. नागरी सुविधा असोत वा इतर पैलू, लोकसंख्येचा हा भार पुणे शहर पेलू शकत आहे का? या संदर्भात आपले काय मत आहे?

उत्तर:

मला एवढेच सांगायचे आहे की, पुणे हे अत्यंत वेगाने वाढणारे शहर आहे. आज लोकसंख्या ५० लाख असली, तरी ती १ कोटींपर्यंत पोहोचण्याचा काळ फार लांब नाही. यासाठी रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

सध्या डेव्हलपमेंट प्लॅन (DP) मध्ये शाळेसाठी, रस्त्यांसाठी किंवा करमणुकीसाठी जागा आरक्षित (Reserve) केल्या जातात. परंतु, त्या आरक्षित जागांचा वेळेत विकास होत नाही. दुसरीकडे लोकसंख्या वाढते आणि इमारती उभ्या राहतात; मात्र त्यांना आवश्यक असणारे पायाभूत सुविधा (Infrastructure), जे सरकार आणि महानगरपालिकेने देणे बंधनकारक आहे, ते वेळेवर उभारले जात नाही. उदा. २४ मीटरचा रस्ता वेळेत २४ मीटरचा होत नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.

पुण्यात विकासासाठी मुबलक वाव आहे. पीएमआरडीए (PMRDA) च्या अंतर्गत ३४ गावे समाविष्ट झाल्यामुळे आता पुणे शहराला पुणे जिल्हा म्हणता येईल. या ३४ गावांमध्ये योग्य पायाभूत सुविधा निर्माण केल्या तर पुण्याच्या मुख्य शहरावर ताण येणार नाही. परंतु, या सुविधा आणि पायाभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर परिस्थिती सुधारणार नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.

प्रश्न : पुणे शहर बकाल होत चालले आहे आणि इथल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोक त्रस्त आहेत. एकेकाळी 'लिव्हेबल' (राहण्यायोग्य) आणि 'लव्हेबल' (प्रेमळ) असलेले हे शहर आता दोन्ही दृष्टीने योग्य राहिलेले नाही, म्हणजेच लोकांना आता पुणे नकोसे झाले आहे का?

उत्तर: मी 'पुणे नकोसे झाले आहे' या विधानावर आक्षेप घेईन. पुणे निश्चितपणे आजही 'लव्हेबल' आहे. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध भागांतील लोकांना पुण्यात राहायचे आहे. पुण्यात आपले किमान एक तरी घर असावे, असे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला वाटते. याच कारणामुळे इथली लोकसंख्या वाढली असून बांधकाम क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे.

पुढील काळात पुणे शहराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मेट्रोतून उतरून थेट घरापर्यंत पोहोचण्याची सोय असणे वेगळे असते; पण मेट्रोतून उतरल्यावर पुन्हा दुचाकी किंवा चारचाकी घेऊन घरी जावे लागत असेल, तर त्याचा पूर्ण फायदा होत नाही. त्यामुळे महानगरपालिका आणि शासनाने पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. असे झाल्यास पुणे हे 'लिव्हेबल' आणि 'लव्हेबल' दोन्ही राहील.

प्रश्न : आपण म्हटल्याप्रमाणे पुण्यात उड्डाणपूल आणि मेट्रो झाली आहे, तरीही नागरिक वाहतूक कोंडीमुळे अत्यंत त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीचे नाव निघताच नागरिकांच्या अंगावर काटा येतो, अशी स्थिती आहे. आपण ही वाहतूक कोंडी का सोडवू शकत नाही, याबद्दल आपल्याला काय वाटते?

उत्तर:

वास्तविक पाहता, आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) वापर फार कमी प्रमाणात करतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर योग्य प्रकारे झाला, तर वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते. सध्या पुणे शहरामध्ये खाजगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका चारचाकी वाहनातून चार व्यक्ती प्रवास करू शकतात, तरीही एकच व्यक्ती गाडी चालवत जाते. लोकांनी एकत्र प्रवास केला, तर वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल.

त्याचप्रमाणे, ज्या प्रमाणात रस्ते रुंद व्हायला हवेत, ते वेळेवर होत नाहीत. मेट्रो आली असली तरी ती अजून सर्वांच्या घरापर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी मेट्रोचे जाळे सर्वदूर पसरवणे आवश्यक आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्यास आणि नागरिकांनी खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास शहरातील वाहतूक कोंडी निश्चितपणे सुटू शकते.

प्रश्न : पुण्याचा विकास करताना किंवा काही प्रकल्प हाती घेताना सर्व गोष्टी उशिरा होतात. उदाहरणार्थ, आपण आधी आयटी पार्क उभारले आणि त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी रस्ते व योजना आखायला सुरुवात केली. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी दोन-तीन तास लागत असतील, तर कंपन्यांना हे कसे मान्य होईल?

उत्तर: मी तुमच्या या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. सुमारे १०-१२ वर्षांपूर्वी पुण्यात एका बैठकीदरम्यान हिंजवडी आयटी पार्कचा विषय निघाला होता, तेव्हा मी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. तेथे कामगारांच्या प्रवासात रोज ४ तास वाया जात असतील, तर त्यांची श्रमशक्ती वाया जाते. त्यामुळे तेथे उड्डाणपूल आणि रस्ते वेळेत बांधणे गरजेचे होते.

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी 'कॉर्पोरेट हब' तयार करण्याचे नियोजन करतो, तेव्हा सरकारने सर्वात आधी तेथील पायाभूत सुविधा (Infrastructure) पूर्ण करणे आवश्यक असते. जेव्हा एखाद्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि प्रसारमाध्यमे ती दाखवतात, तेव्हा सरकारला जाग येते. समस्या गळ्यापर्यंत आल्यावर काम करण्याऐवजी, जर आपण आधीच पायाभूत सुविधांची निर्मिती केली, तर सर्वांचे जीवन अधिक आनंदी आणि सुकर होईल.

प्रश्न : देशात नवीन गुंतवणूक येण्याऐवजी आहे ते उद्योग बाहेर जात आहेत हे सरकार आणि व्यवस्थेचं अपयश वाटत नाही का ?

उत्तर: गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत याचं कारण असं की तिथं एक खिडकी योजना आहे. जर तिथं साधा प्लॉट पाहिजे म्हटलं तर दुसऱ्या दिवशी अधिकारी फोन करून सांगतात की तुमच्यासाठी दहा हजार कोटी, चाळीस कोटीचा प्लॉट उपलब्ध आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही? आपल्याकडे प्रक्रियेलाच फार वेळ लागतो. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझ्या काही मित्रांनी गुजरातमध्ये व्यवसाय सुरू केला, त्यावेळी त्यांना असं का विचारलं तर त्यांनी सांगितलं की तिकडे काम खूप लवकर होतं, आपल्याकडे ज्या गोष्टींना दोन वर्ष वेळ लागतो ते काम दोन महिन्यात पूर्ण होतं, आणि व्यवसाय लवकर सुरू होतो. जर शेजारचं राज्य हे करू शकतं तर आपण का करू शकत नाही. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाबाबत भूमिका खूप चांगली आहे. पण त्यांना अधिकाऱ्यांनीही साथ दिली तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल. 

प्रश्न : पुण्यामध्ये आपण अनेक बांधकाम प्रकल्प उभारले त्यामुळे हा प्रश्न पुण्यातील घरांची सरासरी किंमत 84 लाख इतकी आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घर ही गोष्ट सध्या आव्हानात्मक आणि दुर्मिळ झाली आहे असं आपल्याला वाटतं का? 

उत्तर : प्रधानमंत्री आवास योजना जर मोठ्या प्रमाणावर राबवली गेली असती तर सर्वांनाच परवडणारी घरं मिळाली असती. त्यावेळी आपल्या पंतप्रधानांचं हेच स्वप्न होतं, प्रधानमंत्री आवास योजना ही खूप चांगली आहे पण तिची अंमलबजावणी फार धीम्या गतीने होत आहे. आता पुण्यामध्ये 84 लाख ही घरांची किंमत शहरांमध्ये आहे मात्र आजूबाजूला ही स्थिती नाही 70-75 लाख ते अगदी 80 लाखांमध्ये चांगली घरं मिळतात. तळेगाव,शिरगाव या भागामध्ये आजही 30 ते 35 लाखात 1 BHK फ्लॅट मिळतो, 2 BHK फ्लॅट म्हटलं तर 50 लाखांमध्येही चांगला मिळतो. जर शहरामध्ये फ्लॅट हवा असेल तर 84 लाख ही किंमत आहे. पण शहरात जागा कमी आहेत, त्यामुळे डेव्हलपमेंट करायला खूप त्रास होतो. रात्री बांधकाम करावे लागतं दिवसा परवानगी नसते. त्यामुळे वेगळे बांधकाम चार्जेसही लागतात. आता जी 34 गावं समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी चांगलं 'इन्फ्रास्ट्रक्चर' उभारलं गेलं तर 84 लाख काय त्यापेक्षाही कमी किमतीत चांगली घरं उपलब्ध होतील. 

प्रश्न :- तुम्ही म्हणताय की शहराच्या आजूबाजूला कमी किमतीत फ्लॅट मिळतात पण सार्वजनिक व्यवस्था सक्षम नाहीत म्हणजे अगदी उदाहरण म्हणून पाहिलं तर तळेगावमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला खराडीला कामानिमित्त यायचं असेल तर तो सकाळी निघाला की संध्याकाळी पोहोचतो त्याला आठवड्यातून चार किंवा तीनच दिवस कामासाठी मिळतात. यावर काय उपाययोजना ?

उत्तर :- निश्चित सार्वजनिक व्यवस्था या सक्षम असल्या पाहिजे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढली तर तळेगाव मध्ये राहणारी व्यक्ती अगदी 20 ते 25 मिनिटात कामाच्या ठिकाणी पोहोचू शकते. स्वतःची गाडी घेऊन निघालो तर ते निश्चित परवडणार नाही कारण पगार कमी आणि आणि जाण्यासाठी लागणारा खर्च जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्वांगीण विकास आणि विचार व्हायला हवा. 

प्रश्न : -नागरी सुविधांचा अभाव आहेच, म्हणजे अगदी उदाहरण घेतलं तर पुण्याच्या विकास आराखड्याचा तर एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे समाविष्ट गावांचा तर आहेच शिवाय जुन्या पुण्याचा विकासा आराखडा असेल यामध्ये अनेक 'अर्थ'पूर्ण गोष्टी आहेत ?

उत्तर :- मी यावर काही बोलू शकत नाही पण एक नक्की की आता सरकारने रिंग रोडचा विषय घेतला आहे रिंग रोड जितका लवकर होईल. तितकी वाहतूक सुलभ होईल. वाहतूक खर्च कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल, रिंग रोड प्लॅन केला आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पुण्याची मेट्रो वरून घ्यायची की खालून यामुळे मेट्रो दहा वर्षे रखडली होती. त्यानंतर मोदी सरकार आलं या संदर्भातला निर्णय झाला आणि आता काही प्रमाणात का होईना पण किमान मेट्रोचं जाळ उभारण्यास सुरुवात तरी झाली कदाचित पुढील पाच वर्षात संपूर्ण शहर मेट्रोमय होईल. रिंग रोड झाला तर बायपास वर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल‌. अवजड वाहनांची वाहतूक जी आता शहरांमधून होते ती कमी होईल आणि याचा नागरिकांना फायदा होईल. 

प्रश्न : - पण मला एक प्रश्न असा पडतो की आपण डबल इंजिन सरकार म्हणतो पुण्यामध्ये तर ट्रिपल इंजिन सरकार आहे म्हणजे जो पक्ष महानगरपालिकेत सत्तेत त्याच पक्षाची राज्यात सत्ता त्याच पक्षाची केंद्रात सत्ता असं ट्रिपल इंजिन सरकार असतानाही हेच प्रश्न नागरिकांना का भेडसावत आहेत, विकासामध्ये गतिरोधक का निर्माण होत आहेत? 

उत्तर : - या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे पण हे खरं आहे की पुणे शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा अगदी देश असेल तिन्हीकडे एकाच पक्षाची सत्ता आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी समन्वयाचा अभाव असावा. इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिसते पण खाली असलेल्या अधिकाऱ्यांची दिसत नाही असं वाटतं ज्या स्पीडनं काम करण्यासाठी मुख्यमंत्री इच्छुक आहेत तसं काम करण्यासाठी खाली असणाऱ्या अधिकारी इच्छुक नाहीत असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं. जर वेगवेगळ्या पक्षांची सरकार असती तर आम्ही 'प्रपोजल' पाठवलं आहे. ते 'अप्रूव्ह' झालं नाही. असं म्हणता येतं पण इथं तशीही परिस्थिती नाही. त्यामुळे इच्छाशक्तीचा अभाव हेच प्रमुख कारण वाटतं. 

प्रश्न :-  एकीकडे नागरी सुविधांचा अभाव हा विषय तर आहेच परंतु पुणे हे खूप छान शहर आहे. म्हणजे सगळ्या बाजूने निसर्ग डोंगर शहराच्या मधोमध वाहणाऱ्या दोन नद्या आहेत. पण निसर्गाचा ऱ्हास या सुज्ञ म्हणवणाऱ्या लोकांच्या शहरात दिसतोय म्हणजे केवळ सुशोभीकरण केलं म्हणजे पर्यावरण राखलं असं नाही तर टेकड्या फोडायला नको, वृक्षतोड व्हायला नको नदी प्रदूषण टाळला पाहिजे हा विचार व्हायला हवा. कितीतरी वर्ष आपण पाहतो जायका प्रकल्प असेल अजूनही आपण तेच अस्वच्छ, घाण पाणी नदीमध्ये सोडतो ही अवस्था आहे. 

उत्तर :- पर्यावरणाविषयी प्रत्येकानेच जागरूक राहिलं पाहिजे. पर्यावरण चांगलं असेल तर चांगली हवा पाणी मिळेल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत मी असं म्हणणार नाही की ही केवळ महापालिकेची सरकारची जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. 

यासाठी आपण स्वतः काय करू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे, ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे की पुणे शहराला तर इतिहास आहे. पुणे एकेकाळी सायकलच शहर होतं मग टांगेवाले आले, मग स्कूटर मग विद्येच माहेरघर झालं, आता ग्रोथ सेंटर आणि मेट्रो शहर झालं त्यामुळे पुणे शहराची रूप ही कायम बदलती राहिली. हे करत असताना मात्र पर्यावरणाचे भान राखलं पाहिजे, आपल्या नद्या दूषित कशा होणार नाहीत हे पाहिले पाहिजे नागरिकांची जबाबदारी म्हणजे नदीत राडारोडा पडणार नाही, कचरा टाकणार नाही हे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. 

प्रश्न :- शहराविषयी नेहमी जे काही वाईट बोलला जातं याच्यामध्ये बांधकाम व्यवसायिक हे नेहमी टिकेचे धनी बनतात, आपण स्वतः देखील एक बांधकाम व्यवसायिक आहात. हे बांधकाम व्यावसायिक शासन किंवा प्रशासन किंवा त्यातील काही घटकांच्या सहाय्याने या शहराची वाट लावतात असं म्हटलं जातं जाहीरपणे बोललं जातं हे तुम्हाला पटतं का?

उत्तर:- मला हे बिलकुल पटत नाही बांधकाम व्यवसाय टिकेचे लक्ष का होतात. बांधकाम व्यावसायिक काय करतात तर बिल्डींग बांधून देतात पण दोष आम्हाला का मिळतो तर इन्फ्रास्ट्रक्चर नीट बनत नाही म्हणजे 18 मीटर 24 मीटर प्लॅनवर आम्हाला मंजुरी देता पण 24 मीटरचा रोडच बनवला जात नाही. त्याला बांधकाम व्यवसायिक काय करणार? मग अशावेळी तुम्ही त्या बांधकाम व्यवसायिकांना सांगा ना अधिकार द्या की हा 24 मीटरचा रोड तुम्ही बनवा त्याचा जो काही 'एफएसआय' किंवा खर्च आहे तो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला जो देणार तो आम्हाला निम्मा द्या. आम्ही तो डेव्हलप करू. पाईपलाईन अजूनही जुनीच आहे त्या पाईपलाईन जर वेळेवर चेंज नाही केल्या तर म्हणजे आम्हाला परवानगी देताना सगळ्या प्रकारचे कर जसं पाणीपट्टी घेता,सफाई पट्टी घेता शिक्षण कर घेता सगळ्या गोष्टी घेता. आम्ही प्लॅन मंजुरीसाठीच कोट्यावधी रुपये देतो. आता जिथे पाणी उपलब्ध नाही तिथं प्लॅन मंजूर करून तुम्ही म्हणता की तुम्ही पाण्याची लाईन टाका आम्ही कशी पाण्याची लाईन टाकू शकतो आम्हाला कोण परवानगी देणार मग अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होतो. ज्यावेळी तुम्ही आमच्याकडून कोट्यावधी रुपये घेतात त्याचवेळी तुम्ही तिथे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभं का करत नाही 

प्रश्न :- नुकताच पुण्यात एक भूमिपूजन समारंभ पार पडला ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यामध्ये पुण्याविषयी बोलत असताना पुण्याचे प्रश्न, पुण्याच्या समस्या या अनुषंगाने बोलत असताना पुरंदरला नवीन विमानतळ होत आहे. तुम्हाला असं वाटतं का की नव्या पुण्याच्या उभारणीतून मूळ शहराचे प्रश्न सुटतील. नवीन पुणे उभारलं तर इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभ करणार ?

उत्तर :- ही बातमी मी सुद्धा वाचली नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं आणि ही गोष्ट नक्कीच योग्य आहे, जसं मुंबई मोठा शहर झालं आणि मुंबईनंतर नवी मुंबई झाली आज पुण्याच्या विमानतळावर प्रचंड लोड आहे त्यामुळे पुरंदर विमानतळाचा प्रयत्न सुरू आहे मागील कित्येक वर्षापासून हा प्रयत्न होता मात्र या सरकारने त्याला परवानगी दिली जमीन भूसंपादन सुरू झालं आहे ते लवकर व्हावं आपल्याला जर नवं पुणे पुरंदरला करायचं असेल तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चरचा डीपी प्लॅन तयार व्हायला हवा आणि त्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवं. आता तयारीला सुरुवात केली तर पुढील पाच वर्षात तो प्लान तयार होईल, नवा पुणे अस्तित्वात आलं तर पुण्यावरचा भार निश्चित कमी होईल. आता आज उदाहरण खातर बघितलं तर मिसिंग लिंक झाला पुणे मुंबई प्रवास अवघ्या दोन तासात होतो जो या अगोदर साधारणतः सात आठ तासात व्हायचा म्हणजे मी स्वतः या प्रवासाचा अनुभव घेतला आहे. नंतर मी डेक्कन क्वीनने प्रवास सुरू केला का तर चला आपण तीन तासात तरी मुंबईला पोहोचू. कसं झालं तर पुण्यात राहणारी व्यक्ती नव्या पुण्यात राहिला जाईल. त्यासाठी डीपी प्लॅन लवकर तयार होणं गरजेचं आहे. नुसता प्लान तयार करून ठेवू नका तर त्याला वर्षभरात मंजुरी द्या ज्या काही हरकती सूचना आहेत त्या वेळीच सोडवा. जर इच्छाशक्ती दाखवली तर हे निश्चित होऊ शकतं. आज या गोष्टींचा विचार केला तरी दहा वर्ष लागू शकतात कारण बोलणं सोपं आहे प्रत्यक्ष कृती करणं अवघड 

प्रश्न :- कृष्णकुमार गोयल यांचा परिचय करून देताना मी म्हटलं की सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातत कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व. आणि योगायोग असा की अगदी दोन दिवसांपूर्वीच आपली पुणे फेस्टिवलच्या अध्यक्षपदी निवड झाली जी एक मोठी परंपरा आहे कारण पुण्याचा गणेशोत्सव हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी पुणे फेस्टिवल आहे ज्याच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली. त्यामुळे हा प्रश्न की अलीकडच्या काळात पुण्याची संस्कृती आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे लोक पावत चालली आहे असं म्हटलं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

उत्तर:- असं लोक बोलतात पण आपण कार्यक्रम घेतला तर निश्चितपणे ही लोक येतात म्हणजे माझा अनुभव तर असा आहे टीका करणारे करत राहतात कारण असं आजची पिढी आणि पूर्वीची पिढी त्यांना ज्या गोष्टी आवडतात जसं आपल्याला भीमसेन जोशी आवडतात आणि आत्ताची पिढी 'हू इज भीमसेन जोशी'असं म्हणते त्यावेळी निश्चितपणे दुःख होतं की अरे यांना काही माहिती आहे की नाही यावर लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे तुमच्या मुलां वर संस्कार तुम्ही केले पाहिजेत ते काही बाहेरचे लोक येऊन करणार नाहीत किंवा google सांगणार नाही. जशी टेक्नॉलॉजी बदलत चालली तसं पालकांचे लक्ष कमी होत चाललं आहे. स्क्रीन टाईम वाढला आहे. यावर लक्ष दिला पाहिजे हे काय सरकार किंवा महानगरपालिकेचे काम नाही तर प्रत्येकाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही अनेक प्रयोग केले आणि आमचा मानस हाच असतो की पुण्यात राहणाऱ्या स्थानिक कलाकाराला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. जेणेकरून त्यांना उत्साह येईल आणि ते पुढील काळात चांगलं काम करू शकतील. 

प्रश्न:- पुणे शहर हे झपाट्याने वाढणार शहर आहे म्हणजे एका बाजूला संस्कृती दळणवळण या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण हे शहर सर्वार्थाने स्मार्ट बनन देखील गरजेचं आहे तरच शहर 'लिव्हेबल' आणि 'लव्हेबल' होईल. आणि यासाठी काय करायला हवं ?

उत्तर :- ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींवर मात करत आपण पुढे गेलो तर निश्चितपणे सगळ्या गोष्टी या 'लव्हेबल' राहतील. पुणे शहर 'लिव्हेबल' तर आजही आहे पण वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न या सगळ्यामुळे सामान्य नागरिक वैतागतो आणि त्याला वाटतं की चला दुसरीकडे,दहा किलोमीटरवर पुढे राहायला जाऊ पण या सगळ्या गोष्टी वेळेवर केल्या किंवा करून घेतल्या तर निश्चितपणे शहर 'लिव्हेबल' राहील कारण पुण्यातील संस्कृती ही वेगळी आहे. जसं महाराष्ट्रात नागपूर आहे मुंबई आहे किंवा देशात दिल्ली, कलकत्ता किंवा हैदराबाद आणि पुणे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी पुण्यात एक वेगळी संस्कृती आहे. ज्याला सांस्कृतिक, सुसंस्कृतपणे असं म्हणता येईल किंवा चला विद्वानांच शहर देखील म्हणता येईल ज्येष्ठ नागरिकांचे शहर म्हणता येईल आपला भाग्य की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात त्यांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे साठ वर्षे झाला म्हणजे तो कामातून गेला असं नाही त्यांच्या साठ वर्षाच्या अनुभवाचा फायदा हा आपण करून घेतला पाहिजे. पुण्यातील एकंदरीत वातावरण हवामान खूप चांगलं आहे. पुण्यात चारही ऋतूंमध्ये राहण्यात वेगळी मजा आहे पुण्यात आलेली व्यक्ती ती भारतात दुसरीकडे कुठेही राहू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे 

प्रश्न :- बांधकाम व्यावसायिक हा विकासाच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा घटक आहे ते शहर सुधारणेत काय योगदान देऊ शकतात म्हणजे आपण जसं म्हटलं तसं बांधकाम व्यवसायिक हे टिकेचे धनी बनतात ज्याचे अनेक कारणं देखील आहेत म्हणजे आपण पर्यावरणाची हानी हा विषय बोललो ज्यामध्ये बांधकाम व्यवसायिकच कशा पद्धतीने वृक्षतोड करतात हे देखील आपण पाहिलं. 

उत्तर: - जे वृक्षतोडी सारख्या गोष्टी करतात अशांवर कारवाई ही निश्चितपणे व्हायला हवी या गोष्टीचा मी कदापी समर्थन करणार नाही मात्र अशा गोष्टी करणारे हे फार कमी आहेत. अनेक व्यावसायिक हे अगदी नियमामध्ये आपलं काम करतात नियम तोडून काम करणारे बोटावर मोजणे इतके असतात मात्र त्यांच्यामुळे सरसकट सर्व बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्र बदनाम होतं या गोष्टीचं वाईट वाटतं. जी लोक असे नियमबाह्य काम करतात त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हायलाच हवी. 

प्रश्न :- शासन प्रशासनातील भ्रष्टाचार हा अलीकडच्या काळातील कळीचा मुद्दा बनला आहे. म्हणजे आपण आत्ताच GEN Z चं आंदोलन पाहिलं ज्यामध्ये नीट पेपर फुटी वरून थेट केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला म्हणजे हा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा होता पण अशा गोष्टी आपण पावलोपावली पाहतो. तुमचा अनुभव काय आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की डीएसके एकदा जाहीरपणे बोलले होते की एक फाईल किती टेबल वरून जाते आणि किती खर्च येतो हे सांगितलं होतं आता ही तशीच परिस्थिती आहे की काही बदल झाला आहे? 

उत्तर :- परिस्थिती काही फार बदलली असं सांगणार नाही मी पण थोड्या फार प्रमाणात या सर्व प्रक्रियेतून जावंच लागतं एवढेच या प्रश्नावर सांगेन. 

प्रश्न:- पुण्याच्या हितासाठी राजकीय पक्ष, नेते मंडळी कितपत संवेदनशील आहेत असं तुम्हाला वाटतं हा या प्रश्नाचा एक भाग आणि दुसरा इथले नागरिक देखील किती संवेदनशील आहेत. 

उत्तर :- काही नेते हे निश्चितपणे संवेदनशील आहेत पण काही नेते गांभीर्याने घेत नाहीत इतकच मी म्हणेन काही स्वतःसाठी काम करतात काही जनतेसाठी काम करतात असे नेते जनतेसाठी काम करतात त्यांच्या प्रति आम्हाला आदरच आहे. आणि जनता ही चांगल्या कामाला नकार देत नाही अनेक एनजीओ देखील आहेत ज्या पुण्यामध्ये चांगलं काम करतात. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून सांगतो की मी स्वतः पुण्यातील जेवढी सांस्कृतिक मंडळ आहेत जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम होतात माझ्याकडे ज्यावेळी लोक येतात त्यावेळी माझ्या लक्षात येतं की या व्यक्तीमध्ये कला आहे हा पुढे जाऊ शकतो त्याला आपण आर्थिक मदत केली पाहिजे त्यादृष्टीने मी गेली साधारण सात आठ वर्षे झाली पुण्यातील बहुतेक सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. उद्देश फक्त हाच असतो की तो कलाकार पुढे जावा 

प्रश्न :- आणखी एक प्रश्न की साधारणतः बांधकाम व्यावसायिक म्हटलं की आपण भलं आणि आपला धंदा बरा असं असतं 

उत्तर :- मला नेहमी काय वाटतं की अनेक लोक आपलं ध्येय फक्त पैसा कमावून इतकं ठेवतात माझा अगदी लहानपणापासून हा स्वभाव होता की आपल्याकडे एक रुपये आहे तर त्यातील चाराने समाजाचे आहेत माझ्याकडे काही नसेल अगदी पाच रुपये, दहा रुपये असतील आणि माझ्याकडे कोणी मागायला आले तर मी त्यांना देऊन टाकायचो हाच माझा स्वभाव राहिला आहे. आपण समाजाचे देणं लागतो. राजकारण सोडून इतर सर्व क्षेत्रांमध्ये माझा वावर आहे, आणि राहतो ज्या गोष्टी करणं मला शक्य आहे त्या गोष्टी मी करतो आणि त्याचा मला आनंदही मिळतो. शेवटी कसं असतं तुम्ही कितीही कष्ट करा कितीही पैसे कमवा पण तुमच्या आयुष्यात जर आनंदच नसेल समाधानच नाही वाटलं तर ते जीवन काय कामाचे. माझा एकही दिवस असा जात नाही की मी कुणाला मदत करत नाही. मी असा अजिबात म्हणणार नाही की मी फार मोठा दान धर्म करतो पण सर्व क्षेत्रांमध्ये आपण काम केल्या पाहिजे बिजनेस एके बिझनेस करावा आणि त्यातच नाव कमवावं असं नसावं. 

प्रश्न :- आता खडकी शिक्षण संस्थेची जबाबदारी देखील आपल्याकडे आहे कॉसमॉस बँकेचे चेअरमन देखील आपण राहिलेले आहात, आता पुणे फेस्टिवल चे अध्यक्ष आहात साहित्य परिषदेमध्ये ही आपण दिसता. हे सगळं करत असताना राजकारण सोडून असं आपण म्हणता याचं नेमकं काय कारण ?

उत्तर :- कारण राजकारण हा आपला पिंड नाही, आपल्या रक्तात नाही त्यामुळे राजकारणात जायचं नाही हे ठरवलं आहे आणि आतापर्यंत तरी ते केलं आहे. पण अगदी खरं सांगू का मला लहान असताना वाटायचं की आपण राजाकारणात गेलं पाहिजे म्हणजे अगदी 1975 ते 1978 मध्ये पण पुढे 1978 मध्ये मी ठरवलं की आपण राजकारणामध्ये जायचं नाही. काही गोष्टी माझ्या नजरेत आल्या आणि मग म्हटलं की आपल्याला हे शक्य नाही तेव्हापासून आतापर्यंत हे कटाक्षाने पाळलं आहे. पण एक नक्की जे मी ठरवलं होतं ते मला परमेश्वर कृपेने मिळालं ते राजकारणापेक्षा फार मोठ. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचा मी अध्यक्ष झालो, ज्या बँकेत मी खातं उघडलं त्या बँकेचा चेअरमन झालो, ज्या आई-वडिलांनी जन्म दिला त्यांच्या नावाने एक दोन कॉलेजेस काढू शकलो त्यामुळे जे मी ठरवलं होतं ते पूर्ण करू शकलो हे मी केव्हा ठरवलं होतं तर जेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असताना मी अनेक मोठी स्वप्न पाहिली होती आणि ती सगळी स्वप्न पूर्ण झाली.