मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न; 'या' दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान - टॉप न्यूज मराठी

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटे अत्यंत भक्तिमय वातावरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली.

या वर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत महापूजेचा ‘मानाचा वारकरी’ म्हणून धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने यांना बहुमान मिळाला.

महापूजेनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना व्यक्त केली. "राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी-समृद्ध होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर विठूरायाचा कृपाशीर्वाद कायम राहो," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात १५ लाखांहून अधिक भाविक आणि वारकरी दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या असून संपूर्ण नगरी 'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या गजराने दुमदुमली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि चोख सुरक्षा व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.