पर्यटन : पावसाळा आला की पुणेकरांचा पहिला पसंतीचा विकेंड स्पॉट म्हणजे ताम्हिणी घाट. मुलशी ते ताम्हिणी दरम्यानचा हा 25 km चा घाट "पुण्याचा चेरापुंजी" म्हणून ओळखला जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोसळणारे असंख्य धबधबे, दाट धुके आणि हिरवीगार दरी यामुळे इथे दरवर्षी हजारो पर्यटकांची गर्दी होते.
सध्या घाटात ठिकठिकाणी धबधबे सुरू झाले आहेत. बाईक राईड, फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी हा घाट एकदम "सैर सपाटा" ठरतो. पावसाच्या सरींसोबत गार वारा आणि ढगांचा लपंडाव ही इथली खासियत आहे. देवकुंड, कवडजा धरण आणि रस्त्यावरचे छोटे-मोठे पॉइंट इंस्टाग्रामवरही ट्रेंडिंग आहेत.
नावामागचा इतिहास:
"ताम्हिणी" हे नाव ताम्हिणी देवीच्या मंदिरावरून पडले आहे. घाटाच्या पायथ्याशी मुलशी तालुक्यात ताम्हिणी देवीचे प्राचीन मंदिर आहे. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार घाटातून प्रवास करणाऱ्यांचे रक्षण देवी करते.
ताम्हिणी घाट हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला महत्वाचा घाटमार्ग आहे. तो पुणे जिल्ह्यातील मुलशी तालुक्याला रायगड जिल्ह्यातील कोलाड, इंदापूरशी जोडतो. उंची सुमारे 500-600 मीटर आहे.
पावसाळ्यात इथे 200+ पेक्षा जास्त छोटे-मोठे धबधबे तयार होतात. म्हणूनच याला "सह्याद्रीचे धबधब्यांचे माहेरघर" म्हणतात. आजूबाजूला घनदाट जंगल, दुर्मिळ पक्षी आणि फुलपाखरे आहेत. ट्रेकर्ससाठी देवकुंड धबधबा आणि अंधारबन जंगल ट्रेक याच परिसरात आहेत.
ब्रिटिश काळात हा घाट व्यापारी मार्ग म्हणून वापरला जायचा. कोकणातील धान्य आणि मीठ पुण्यात आणण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असे. आजही घाटात जुन्या दगडी पुलांचे अवशेष दिसतात.
सध्या ताम्हिणी घाटामध्ये रस्ते मोठ्या प्रमाणावर खचले आहेत. मागील आठवड्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून काही ठिकाणी पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून या मार्गावर जाणाऱ्या वाहनांना बंदी घातली आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या दिशेने जाण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असून परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच घाट वाहतुकीसाठी खुला केला जाईल.