महिला व बालकल्याण विभाग : अंगणवाडीच्या आहारात बदल ! मुलांच्या ताटात आता येणार शाकाहारी पुलाव - टॉप न्यूज मराठी

पुणे : अंगणवाडीत मिळणाऱ्या पोषण आहारात आता मोठा बदल होणार आहे. महिला व बालविकास विभागाने नवीन मेनू ठरवला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2026 पासून हा नवीन आहार अंगणवाडीतील मुलांना, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना मिळणार आहे.

आतापर्यंत तूरडाळ खिचडी दिली जायची, तिच्या जागी आता शाकाहारी पुलाव देण्यात येणार आहे. मूगडाळ खिचडी तशीच राहणार आहे, पण आता तिच्यासोबत वेगळे मसाल्याचे पाकीटही मिळणार आहे. 

त्याचबरोबर आहारात एक नवा पदार्थ जोडला आहे तो म्हणजे बहुधान्य पौष्टिक पफ. जुने जे भरडधान्याचे मिश्रण होते त्याऐवजी हा पफ दिला जाणार आहे. बाकी बहुधान्य प्रथिन मिश्रण जैसे थे राहणार आहे.

हा बदल का केला? तर मुलांना आणि महिलांना आहार जास्त चविष्ट आणि पौष्टिक मिळावा, आणि त्यांनी तो आवडीने खावा म्हणून.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी याबत माहिती दिली.

महिला व बालविकास समितीच्या सभापती अंकिता पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यात ग्रामीण भागात 4,395 अंगणवाड्या आहेत. यामधून जवळपास 1 लाख 6 हजार मुलांना आणि गरोदर व स्तनदा मातांना घरपोच पोषण आहार दिला जातो. नोव्हेंबरपासून सर्व अंगणवाड्यांमध्ये हा नवीन मेनू सुरू करण्यात येणार आहे.