तंत्रज्ञानावर आधारित अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या 'झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस लिमिटेड'ला त्यांच्या प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) भांडवली बाजार नियामक संस्था 'सेबी'कडून (SEBI) मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे कंपनीला सार्वजनिक बाजारातून भांडवल उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कंपनीच्या या आगामी आयपीओमध्ये नवीन समभाग आणि विद्यमान समभागधारकांकडून 'ऑफर फॉर सेल' चा समावेश असण्याची शक्यता आहे. झेटवर्क कंपनीमध्ये खोसला व्हेंचर्स, बेली गिफर्ड, राकेश गंगवाल, अॅक्सेल, पीक XV (पूर्वीची सिक्वॉया कॅपिटल), ग्रीनओक आणि लाइटस्पीड यांसारख्या दिग्गज जागतिक गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे.
अमृत आचार्य आणि श्रीनाथ रामकृष्णन यांनी २०१८ मध्ये स्थापन केलेली झेटवर्क ही कंपनी प्रामुख्याने तंत्रज्ञान-सक्षम उत्पादन प्लॅटफॉर्म चालवते. हा प्लॅटफॉर्म औद्योगिक क्षेत्रातील मागणी आणि पुरवठादारांचे जागतिक नेटवर्क एकत्र आणण्याचे काम करतो. सध्या कंपनीचा व्यवसाय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, एरोस्पेस आणि कॅपिटल गुड्स यांसारख्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. याशिवाय, औद्योगिक पुरवठा आणि कच्च्या मालाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्लॅटफॉर्मचाही यात समावेश आहे.
स्वतःच्या मालकीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांसह आणि जागतिक स्तरावरील विस्तृत 'थर्ड पार्टी' पुरवठादार नेटवर्कच्या माध्यमातून झेटवर्कने आपल्या कामकाजाचा मोठा विस्तार केला आहे. विशेष म्हणजे, कंपनी आपल्या मालकीच्या 'झेटवर्क ओएस' या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करते. या सॉफ्टवेअरद्वारे सोर्सिंग, उत्पादन नियोजन, पुरवठादार समन्वय आणि संपूर्ण नेटवर्कमधील प्रकल्प अंमलबजावणीचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे केले जाते.
'सेबी'च्या या मंजुरीनंतर आता गुंतवणूकदारांचे लक्ष झेटवर्कच्या आयपीओच्या अधिकृत तारखांकडे आणि प्राईस बँड कडे लागले आहे.